भूम (प्रतिनिधी)- पेठ-कसबा भागाला जोडणाऱ्या बाणगंगा नदीवरील पुलाच्या लोखंडी कठड्याचे काम अखेर नगरपरिषदेने सुरू केले आहे.  पुरोगामी विचारांचे लोकराजने या पुलावरील कठडे नसल्यामुळे निर्माण झालेल्या धोक्याबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. या वृत्तांची दखल घेत नगरपरिषदेने शुक्रवार दि. 8  ऑगस्ट रोजी पुलावर नवीन लोखंडी कठडे बसविण्याच्या कामास सुरुवात केली.

मागील वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदीला मोठा पूर आला होता. पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बाणगंगा नदीवरील पुलाचे लोखंडी कठडे वाहून गेले होते. त्यानंतर पुलावर कठडे नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः पुलाच्या कडेला संरक्षण नसल्यामुळे रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात अपघाताची शक्यता वाढली होती.

पूल हा कसबा आणि पेठ विभागाला जोडणारा महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. कसबा परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच अन्य नागरिकांना विविध कामांसाठी दररोज पेठ विभागात ये-जा करावी लागते. त्यामुळे पुलावरील कठडे वाहून गेल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पुलावरून वाहतूक आणि पादचारी वर्दळ मोठ्या प्रमाणात असतानाही संरक्षणात्मक कठडे नसल्याने एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली होती.


एक वर्षापासून नागरिकांचा पाठपुरावा

पुरामुळे कठडे वाहून गेल्यानंतर तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला, तरी पुलावर नवीन कठडे बसविण्याचे काम झाले नव्हते. याबाबत कसबा विभागातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी करून पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती. मात्र, कामाला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.


दरम्यान, पुरोगामी विचारांचे लोकराजने पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने आपल्या वृत्तातून मांडला. पुलावरील कठडे नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. कठडे बसविण्याचे काम पूर्ण होईपर्यंत या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला. अखेर नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेत शुक्रवारी पुलाच्या लोखंडी कठड्याचे काम सुरू केले. त्यामुळे कसबा व पेठ भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, पुलाची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.


नागरिकांकडून समाधान व्यक्त

एक वर्षापासून प्रलंबित असलेले काम अखेर सुरू झाल्याने कसबा विभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुलावर मजबूत आणि सुरक्षित लोखंडी कठडे बसविण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच भविष्यात पुरामुळे अशा प्रकारची हानी झाल्यास दुरुस्तीची कामे दीर्घकाळ प्रलंबित ठेवू नयेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


 
Top