धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, जिल्हा धाराशिवच्या वतीने आयोजित ‘स्वर स्वातंत्र्याचे' हे देशभक्तीपर कविसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हे राज्यस्तरीय कविसंमेलन झाले.
सुप्रसिद्ध गझलकार प्रा. शेखर गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनाचे उद्घाटन डॉ अभय शहापूरकर यांच्या हस्ते व साहित्य भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, कार्याध्यक्ष सुनिता गुंजाळ कवडे, उपाध्यक्ष प्रा डॉ दीपक सुर्यवंशी, जिल्हा मंत्री प्रा डॉ कृष्णा तेरकर, सह संघटन मंत्री समाधान शिकेतोड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. धाराशिव जिल्ह्यासह विविध भागांतील कवींनी देशभक्ती, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्य, सामाजिक बांधिलकी आणि वर्तमान सामाजिक वास्तवावर आधारित कविता सादर केल्या. या कवी संमेलनाला साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य नरेंद्र पाठक, डॉ अभय शहापूरकर, यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. कविसंमेलनाची सुरूवात जना गोरे यांच्या कवितेने झाली. तर कळंब येथील कवयित्री संध्याराणी कोल्हे यांनी सादर केलेली
'या मातीत जन्म झाला,याचा मनी अभिमान
तिरंगा आहे अमुचि,खरी आन,बान अन् शान'
ही कविता देशभक्ती जागवणारी ठरली.
त्यानंतर अश्विनी घाट, बी. सुरभी, जयश्री फुटाणे, सुजाता कांबळे, ज्योती कावरे-राऊत यांच्या रचनांनी कवी संमेलनात बहार आणली.कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध गझलकार स्नेहल कुलकर्णी यांनी
'एकाएकी मौनव्रताचा विचार मारू शकते
किर्र शांतता कातरवेळी टाहो फोडू शकते
देह अमंगल वाटू शकतो आत्मा निर्मळ असतो
वेश्यासुद्धा सुशीलतेचा विचार मांडू शकते'
या गझलेने विचार करायला भाग पाडले. कवी अरुण कांबळे, योगिता सुरवसे यांच्या रचनाही लक्षवेधी ठरल्या. बार्शी येथून आलेले गझलकार जीवन धेंडे यांनी सादर केलेल्या
'मी शब्द शब्द लिहितो, अत्यंत आदराने...
प्रत्येक शब्द येतो,काळीज फाटल्याने....
मी विस्मरून जातो,माझे मलाच तेव्हा,
माझे असेच होते, डोळ्यात पाहिल्याने...'
या शेरांमधून मैफिलीत रंगत आणली. कृष्णा आनंदगावकर यांनी प्रेम कविता सादर करून वाहवा मिळवली. कवी शंकर खामकर, सुभाष चव्हाण, डॉ. संजय सोनटक्के, स्नेहलता झरकर, भाग्यश्री देवकते यांच्या रचनांनी रसिकांची वाहवा मिळवली. धाराशिव येथील कवी गणेश मगर यांनी सादर केलेली
'चला तर मग प्रेमाच्या गोष्टी सांगू..
प्रेम माझ्या मायेनं अन् बापानं केलं होतं...' या कवितेतून प्रेमाची संकल्पना अधिक विस्तृत केली.
कवी रवींद्र शिंदे, ॲड. जयश्री तेरकर यांनी सादर केलेल्या रचनांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर कवयित्री उज्वला शिंदे यांनी सादर केलेल्या,
'सांग कधी का कोणासाठी
रात्र राहते अशीच रुसुनी
उगवेल उद्याची पहाट रेशमी
जातील हे ही दिवस साजणी..'
या रचनेने सभागृहाला गंभीर केले. तर कवी हनुमंत पडवळ यांनी गेय कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कवी बाळासाहेब मगर, कविता पुदाले, सुनीता गुंजाळ, बालकवी अश्रुबा कोठावळे, प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. मधुकर हुजरे, सौ. अर्चना गोरे आदी कवींनी दर्जेदार कविता सादर करत कविसंमेलनात रंग भरले. शेवटी कविसंमेलनाचे अध्यक्ष शेखर गिरी यांनी
'मिळाले काय आम्हाला तुला मागून स्वातंत्र्या
गुलामी चालली अमुची कधीपासून स्वातंत्र्या
तुला मिळवायला केले इथे बलिदान लाखोंनी
सहज फासावरी चढले कुणी हासून स्वातंत्र्या'
या गझल मधून स्वातंत्र्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या व अध्यक्षीय समारोप केला.
कवींच्या विविधांगी कवितांमधून स्वातंत्र्याची मूल्ये, राष्ट्रप्रेम, सामाजिक प्रश्न आणि मानवी संवेदना प्रभावीपणे व्यक्त झाल्या. कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर व भाग्यश्री देवकाते यांनी केले. जेष्ठ साहित्यिक गझलकार तथा देवगिरी प्रांत संघटन मंत्री युवराज नळे यांच्या मार्गदर्शनाखाली
सदरील कवी संमेलनाचे आयोजन साहित्य भारतीच्या धाराशिव जिल्हा शाखेने केले होते. कवी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अविनाश मुंढे, गणेश मगर, ॲड जयश्री तेरकर, अश्विनी धाट, कविता पुदाले, बी सुरभी, हनुमंत पडवळ, अश्रुबा कोठावळे इत्यादींनी प्रयत्न केले. कविसंमेलनाला धाराशिव शहर व परिसरातील काव्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.
