धाराशिव (प्रतिनिधी)- पवनचक्कीच्या पॉइंटवरून कॉपर केबल, कॉपर रॉड, तार आदी साहित्य चोरी करणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडून पवनचक्कीचे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप असा एकूण 4 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पवनचक्की चोरीचे तब्बल चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी अनसुर्डा शिवारातील फॉरेस्ट परिसरात पवनचक्कीच्या पॉइंटवरून चोरी करणारी टोळी दाट झाडीमध्ये थांबली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने फॉरेस्ट परिसरात वाहने काही अंतरावर थांबवून पायी जात संशयितांचा शोध घेतला. पोलिसांची चाहूल लागताच काही इसम झाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चौघांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची अभिलेखावरून माहिती घेतली असता, त्यांच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्येही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पवनचक्की चोरीबाबत चौकशी केली असता, नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी) याने खामकरवाडी येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पवनचक्कीचे चोरी केलेले साहित्य ठेवले असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ खामकरवाडी येथे जाऊन कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार आदी साहित्य ताब्यात घेतले. या मुद्देमालाबाबत अधिक तपास केला असता वाशी व येरमाळा पोलीस ठाण्यांमध्ये पवनचक्की चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. या कारवाईत अनिल नाना काळे (वय 40, रा. मस्सा), नंदू रामा शिंदे (रा. खामकरवाडी), बबलू ऊर्फ राम शिवाजी शिंदे (वय 29, रा. खामकरवाडी) आणि शाम ऊर्फ बाबा शंकर शिंदे (वय 28, रा. खामकरवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून पवनचक्कीचे कॉपर केबल वायर, कॉपर रॉड, तार तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा 4 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे पवनचक्की चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, चापोहे महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड व रोहित दंडनाईक यांनी केली.
