तुळजापूर (प्रतिनिधी)- ‌‘सत्ताधाऱ्यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करून मराठ्यांवर अन्याय केला आहे. आमचे कुणी काही करू शकत नाही, अशी हवा सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात गेली आहे. मात्र त्यांचा बहुमताचा माज उतरवू,' असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी (दि. 8) तुळजापूर येथे दिला.

श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‌‘सत्ताधारी मराठ्यांना फसवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे मराठा समाजाने आता सावध होण्याची गरज आहे,' असे त्यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर टीका करत जरांगे पाटील म्हणाले, ‌‘ज्या जनतेने तुम्हाला बहुमत दिले, तीच जनता तुमचा माज उतरवू शकते.' सत्तेच्या जोरावर कोणावरही अन्याय करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

गोरगरीब मराठा समाजातील मुलांवर अन्याय करू नका. आधी कुणबी प्रमाणपत्र देता आणि नंतर ते रद्द करता, हे कसे शक्य आहे? दादागिरी करून प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिरसाट काम करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

‌‘मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, हा सरकारचा प्रयत्न आहे,' असा आरोप करत आपण आरक्षणाची मागणी ठामपणे करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत असल्याने मराठा समाजात ‌‘कुणबी प्रमाणपत्र काढावे की नाही?' याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे आणि हीच परिस्थिती सरकारला हवी असल्याचा आरोप त्यांनी केला. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, या कथित षडयंत्रात सहभागी असलेल्या व्यक्तींची नावे 29 ऑगस्ट रोजी जाहीर करणार, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर टीका केली. पक्षीय आधारावर भेदभाव करून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना झुकते माप दिल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ‌‘आमची काही चूक नाही, गैरसमज झाला आहे,' अशा प्रतिक्रिया दिल्या जात असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी यावेळी काही कागदपत्रे पत्रकारांसमोर दाखवली. तीन कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणांची माहिती देताना त्यांनी एका प्रकरणात बहिणीचे प्रमाणपत्र रद्द झाले, मात्र भावाची वैधता कायम असल्याचा दावा केला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीने माजलगाव तहसीलदारांना कुणबी प्रमाणपत्राबाबत तातडीने कारवाई करण्याचे पत्र दिल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रातील शब्दरचनेवर प्रश्न उपस्थित करत त्यातून वेगवेगळे अर्थ निघत असल्याचा दावा त्यांनी केला.

प्रमाणपत्र रद्द करायचे असेल तर मीडिया ट्रायल कशासाठी?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोरगरीब मराठा कुटुंबातील मुलांवर अन्याय होऊ नये, असे सांगत जरांगे पाटील यांनी ‌‘दोन वर्षांपूर्वी दिलेले प्रमाणपत्र कसे रद्द केले जाते?' असा सवाल केला. सरकारला मराठा आरक्षण टिकू द्यायचे नाही, असा आरोप करत त्यांनी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. ‌‘प्रमाणपत्र रद्द करा, असे म्हणणारा मंत्री असू शकतो का?' असा सवालही त्यांनी केला.


‌‘आंदोलन मोठे; पण शांततेच्या मार्गाने'

यापुढील मराठा समाजाचे आंदोलन मोठे असेल; मात्र ते शांततेच्या मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने केले जाईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‌‘मराठ्यांचे वाटोळे होत असेल तर उठाव करावाच लागेल,' असा इशाराही त्यांनी दिला. सरकारने सर्व जाती-धर्मांना समान न्याय द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.


तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन पश्चिम महाराष्ट्राकडे

हिंदू धर्मातील परंपरेनुसार शुभकार्याची सुरुवात देवदर्शन आणि आशीर्वाद घेऊन करण्याची प्रथा आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन पुढे झटणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

शनिवारी सकाळी त्यांनी थेट श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यांच्या पूजेचे पौरोहित्य पुजारी कुमार टोले यांनी केले. यावेळी महंत वाकोबुवा यांनी 151 कवड्यांची माळ देवीच्या चरणी अर्पण करून ती जरांगे पाटील यांच्या गळ्यात घातली. कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने तुळजापुरात दाखल झाले होते. दर्शनानंतर जरांगे पाटील यांचा ताफा तुळजापूरहून काठी मार्गे सोलापूर जिल्ह्यात, म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाला. मार्गातील विविध गावांमध्ये मराठा समाजबांधवांकडून त्यांचे पुष्पहार, पुष्पवृष्टी आणि घोषणांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. तुळजाभवानी मातेचे दर्शन, मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सुरू झालेला दौरा यामुळे आगामी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची पार्श्वभूमी अधिकच तापली आहे.


 
Top