तुळजापूर/ उमरगा (प्रतिनिधी)- विलासराव देशमुख सेंटर, धाराशिव यांच्या वतीने आयोजित ‌‘वक्ता धाराशिवचा आवाज तरुणाईचा' या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. उमरगा तालुक्यातून अमृता खटके तर तुळजापूर तालुक्यातून समर्थ लोंढे याने प्रथम क्रमांक पटकावला. ‌‘राजकारणातील लोकशाही मूल्ये : आजच्या काळाची गरज', ‌‘डिजिटल युगातील माध्यम साक्षरता' आणि ‌‘युवक आणि नेतृत्व : आजची प्राथमिकता, उद्याचे भविष्य' या विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावी विचार मांडले.

उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, आणि तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विलासराव देशमुख सेंटरच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील खटके अमृता गुंडेराव यांनी प्रथम क्रमांक पटकावत रुपये 2,500 व स्मृतिचिन्ह मिळविले. बी.एस.एस. महाविद्यालय, माकणी येथील मुगळे सुप्रिया नेताजी यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रुपये 1,500 व स्मृतिचिन्ह, तर भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा येथील जावळे संजना यांनी तृतीय क्रमांक मिळवून रुपये 1,000 व स्मृतिचिन्ह पटकावले. श्रीकृष्ण महाविद्यालय, गुंजोटी येथील म्हेत्रे आकांक्षा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तुळजापूर तालुक्यातून अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या समर्थ लोंढे याने प्रथम, नळदुर्ग येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सई शिंदे हिने द्वितीय तर अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या प्रतीक्षा गायकवाड हिने तिसरा क्रमांक पटकावला.

उमरगा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र केसकर व प्रशांत पाटील उपस्थित होते. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, मा. बाबा औटी, नगरसेवक बाबा मस्के, रेखाताई सूर्यवंशी, ॲड. जान्हवी कोथिंबीरे, आदर्श कोथिंबीरे, अभिषेक, अभिषेक औरादे, उपप्राचार्य विनोद देवरकर, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, पर्यवेक्षक शैलेश महामुनी आणि डॉ. श्रीशैल्य तोडकर यांची उपस्थिती होती.

स्पर्धेचे परीक्षण डॉ. ढोबळे डी. बी. व श्री. अविनाश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित रेड्डी यांनी केले. तुळजापूर येथील स्पर्धेस प्राचार्य डॉ.श्रीमंत लोखंडे, उपप्राचार्य डॉ. भाले, अग्निवेश शिंदे, ॲड.अनिकेत देशमुख, सुनील बडूरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख अशोक मर्डे, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ.गोविंद काळे, प्रा.एम एस कदम अनिल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.अनिकेत देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन अग्निवेश शिंदे यांनी केले.


 
Top