तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रावण महिना आणि स्वातंत्र्यदिनाच्या सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी देवीच्या दरबारी भाविकांचा अथांग महापूर लोटला आहे. वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे शहरातील सर्व वाहनतळे तुडुंब भरली असून, 

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहाटे एक वाजताच श्रीं देविजीचे चे चरणतीर्थ पार पाडून धर्मदर्शन खुले करण्यात आले. सलग  20 ते 22 तास मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले असूनही भाविकांचा ओघ थांबण्याचे नाव घेत नाहीये. सकाळी आठ वाजल्यापासून सुरु झालेली भाविकांची गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. भाविकांच्या वाढत्या वर्गाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी दर सशुल्क दर्शन पासेस काही काळ थांबवण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिर संस्थानाचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक दर्शन रांगा सुरळीत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मंदिर प्रशासनाने सशुल्क दर्शन आणि धर्मदर्शन रांगा एकत्रित करण्याचा जो स्तुत्य निर्णय घेतला आहे, त्याचे सर्वसामान्य भाविकांमधून जोरदार स्वागत होत आहे.

सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने भाविक श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन झाल्यानंतर थेट बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यामुळे तुळजापुरातील मुख्य बाजारपेठ पेढे, कवड्यांच्या माळा आणि धार्मिक साहित्याच्या खरेदीने गजबजून गेली आहे. सध्या धर्मदर्शन, सशुल्क दर्शन, मुखदर्शन आणि राम बिडकर पायऱ्यांवरून भाविकांना सोडण्यात येत आहे. श्रावण महिना संपेपर्यंत भाविकांचा हा भक्तीचा महापूर असाच कायम राहणार असल्याचे चित्र आहे.

 
Top