धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नितळी येथील इयत्ता सातवीतील रिद्धी नानासाहेब वरपे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत 198 गुण मिळवत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नितळीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीचे 7 विद्यार्थी, इयत्ता चौथीचे 5 विद्यार्थी आणि इयत्ता सातवीचे 9 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या या सातत्यपूर्ण यशामुळे नितळी शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्तापूर्ण कामगिरी अधोरेखित केली आहे. याचबरोबर नासा अंतराळ संशोधन केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत तालुकास्तरावरून जिल्हास्तरीय फेरीसाठी शाळेचे देवांश जाधव आणि श्रेयस भोसले या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अंतराळ विज्ञानासारख्या क्षेत्राशी संबंधित परीक्षेत मिळविलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावासोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. कुमारी रिद्धी वरपे, देवांश जाधव, श्रेयस भोसले तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकवृंद यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top