धाराशिव (प्रतिनिधी)- अनिश्चित पाऊस,दुष्काळी परिस्थिती आणि पारंपरिक पिकांतील वाढते उत्पादनखर्च यामुळे अनेक शेतकरी पर्यायी शेतीकडे वळत आहेत.अशा परिस्थितीत रेशीम शेती हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून,कमी पाण्यात,कमी कालावधीत आणि हमखास उत्पन्न देणारा हा उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत आहे.तुती लागवडीपासून रेशीम धागा आणि कापड निर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर रोजगार निर्माण करणारा हा शेतीपूरक उद्योग जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
धाराशिव जिल्ह्याचे हवामान आणि भौगोलिक परिस्थिती रेशीम उद्योगासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति एकर वार्षिक दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.मराठवाडा विभागात रेशीम उद्योग आणि कोष उत्पादनात धाराशिवने दुसरे स्थान मिळविले असून,100 टक्के शेतकरी रेशीम अळ्यांची ‘चॉकी' घेणारा आणि 100 अंडीपुंजामागे उत्कृष्ट कोष उत्पादन करणारा अग्रगण्य जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने मार्च 2016 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तुती लागवडीला मान्यता दिल्यानंतर या उद्योगाला मोठी चालना मिळाली.जिल्ह्यात सध्या 14 रेशीम किटक चॉकी पुरवठा केंद्रे कार्यरत आहेत.या केंद्रांमुळे शेतकऱ्यांना एका पिकासाठी केवळ 20 ते 22 दिवसांचा कालावधी लागतो आणि वर्षभरात किमान चार ते पाच पिके घेणे शक्य होते.एका पिकातून सुमारे 50 हजार रुपयांपर्यंत,तर चार पिकांतून सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याने हा उद्योग शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
रेशीम उद्योगाचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य शासनाने सन 2017 पासून ‘महारेशीम अभियान' सुरू केले.चालू वर्षापासून रेशीम विभागासोबतच कृषी विभाग आणि पंचायत समित्यांमार्फतही ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यात रेशीम उद्योगाच्या विस्ताराला अधिक गती मिळणार आहे.
धाराशिवसारख्या अल्प पर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यातही रेशीम शेती यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. अवेळी पावसाचा फटका बसत असतानाही इतर पिकांच्या तुलनेत कमी पाण्यावर चांगले उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी या उद्योगाकडे वळत आहेत. किमान आठ महिने पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनाही रेशीम शेती करता येते.विशेष म्हणजे,एकदा तुतीची लागवड केल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत त्यातून उत्पन्न मिळू शकते,ही या उद्योगाची मोठी जमेची बाजू आहे. मनरेगा अंतर्गत एक एकर तुती लागवडीसाठी अकुशल आणि कुशल कामांसाठी मिळून 4.32 लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध होत आहे.त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनाही या उद्योगात उतरायला प्रोत्साहन मिळत आहे.
सध्या जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत 1,380 कामे सुरू असून,1,560 शेतकरी रेशीम उद्योगाशी जोडले गेले आहेत.जिल्ह्यात 1,585 एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली आहे.आतापर्यंत 8.76 लाख अंडीपुंजांचा पुरवठा करण्यात आला असून,त्यातून 523 टन रेशीम कोषांचे उत्पादन झाले आहे.
रेशीम कोष उत्पादनापुरताच हा उद्योग मर्यादित नसून,कोषापासून धागा निर्मिती (रीलिंग),ट्विस्टिंग युनिट्स आणि इतर मूल्यवर्धित उद्योगांसाठीही मोठ्या संधी उपलब्ध आहेत.जिल्ह्यात कळंब तालुक्यातील देवधानोरा,भूम तालुक्यातील माणकेश्वर आणि वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे रेशीम शेती गट कार्यरत आहेत.उत्पादित रेशीम कोषांना बेंगळुरूसह जालना,बीड आणि सोलापूर येथील बाजारपेठ उपलब्ध आहे.
याशिवाय,आकांक्षीत जिल्हा धाराशिवसाठी ‘धाराशिव सिल्क क्लस्टर' प्रकल्पालाही मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे भविष्यात रेशीम उद्योगाची संपूर्ण मूल्यसाखळी जिल्ह्यात विकसित होण्यास चालना मिळणार असून, स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
रेशीम शेती ही केवळ पर्यायी शेती नसून,शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचा,ग्रामीण रोजगाराचा आणि शाश्वत कृषी विकासाचा प्रभावी मार्ग ठरत आहे.कमी पाण्यात अधिक उत्पन्न आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देणारा हा उद्योग धाराशिवच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे.