धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत आठ दिवसांत 63 गुन्हे दाखल केले.या कारवाईत 53 आरोपींना अटक करण्यात आली असून,तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.देशी-विदेशी मद्य, अवैध हातभट्टी दारू,रसायन तसेच परराज्यातील विदेशी मद्यासह एकूण 34 लाख 32 हजार 665 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजेश देशमुख,आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता), राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच संगीता दरेकर, विभागीय उपआयुक्त,राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या निर्देशानुसार अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 जुलै ते 5 ऑगस्ट 2026 या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धाराशिव यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व जवान,उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,लातूर जिल्हा,विभागीय उपआयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखालील निरीक्षक, विभागीय भरारी पथक,छत्रपती संभाजीनगर तसेच जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई केली.
धाराशिव तालुक्यातील शासकीय दूध डेअरी पारधी वस्ती,जागजी लमाण तांडा,तुळजापूर तालुक्यातील खडकी तांडा, उमरगा तालुक्यातील पळसगाव तांडा आणि कळंब तालुक्यातील घारगाव तांडा आदी हातभट्टी निर्मिती केंद्रांवर धाड टाकून 30 गुन्हे दाखल करण्यात आले.या कारवाईत 20 आरोपींना अटक करण्यात आली.तसेच 1,057 बल्क लिटर अवैध हातभट्टी दारू आणि 27,250 बल्क लिटर रसायन नष्ट करण्यात आले.या कारवाईत 11 लाख 13 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याच कालावधीत हातभट्टी दारूची विक्री व वाहतुकीविरोधात 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 7 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत 43 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हॉटेल,ढाबे व इतर ठिकाणी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरोधातही कारवाई करत 14 गुन्हे दाखल करण्यात आले.या कारवाईत 14 आरोपींना अटक करण्यात आली असून,51.64 बल्क लिटर विदेशी मद्य आणि 142.56 बल्क लिटर देशी मद्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत 67 हजार 295 रुपये आहे.
परराज्यातून आणलेल्या मद्याविरोधातही विशेष मोहीम राबविण्यात आली.या अंतर्गत 5 गुन्हे दाखल करून 5 आरोपींना अटक करण्यात आली.या कारवाईत गोवा राज्यात उत्पादित परंतु महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले 935.92 बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. तसेच तीन वाहने जप्त करण्यात आली असून, या कारवाईतील मुद्देमालाची किंमत 21 लाख 84 हजार 70 रुपये आहे.उमरगा तालुक्यातील तलमोड येथील सीमा तपासणी नाक्यावर 29 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात आली.
या तपासणीत अनधिकृत मद्यवाहतूक आढळून आली नसली,तरी भविष्यातही अशाच पद्धतीने अचानक तपासणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव यांच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी,तुळजापूर यांच्या पथकासह पाटील तांडा (ता.तुळजापूर) येथे हातभट्टी निर्मिती केंद्रावर संयुक्त कारवाई करून गुन्हे दाखल केले.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी,कळंब यांच्या पथकासह लक्ष्मीनगर तांडा, तेरखेडा (ता. वाशी) येथेही संयुक्त कारवाई करण्यात आली.या विशेष मोहिमेत एकूण 63 गुन्हे दाखल करून 53 आरोपींना अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान 3 वाहने, 142.56 बल्क लिटर देशी मद्य,51.64 बल्क लिटर विदेशी मद्य,1,057 बल्क लिटर अवैध हातभट्टी दारू, 27,250 बल्क लिटर रसायन तसेच 935.92 बल्क लिटर गोवा राज्यात उत्पादित विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून,एकूण 34 लाख 32 हजार 665 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील काळातही अवैध मद्यनिर्मिती,वाहतूक आणि विक्रीविरोधात अशाच धडक कारवाया सुरू राहतील,असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरू असून,अवैध मद्य विक्री करणारे हॉटेल,ढाबे अथवा अवैध मद्यनिर्मिती,वाहतूक व विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर माहिती द्यावी.माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल,असे आवाहन विभागाने केले आहे.