भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील आराधी मंडळ कडून देवावरची श्रद्धा केवळ पूजा-अर्चनेपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष सेवेत उतरविण्याचा आदर्श भूम शहरातील चव्हाण आराधी मंडळाने घालून दिला आहे. तब्बल 50 वर्षांपासून श्री अंबाबाईच्या सेवेत कार्यरत असलेल्या या मंडळाने भूमच्या ऐतिहासिक धार्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या श्री जगदंबा देवी मंदिरासाठी पत्र्याचा सभामंडप उभारून तो देवीच्या चरणी अर्पण केला आहे. विशेष म्हणजे, आराधी मंडळाच्या कार्यक्रमांतून मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे.

भूम शहरातील धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची किंवा लोकप्रतिनिधींची नसून समाजातील प्रत्येक भक्ताची आहे, याचा संदेश चव्हाण आराधी मंडळाच्या या उपक्रमातून मिळत आहे. आराधनेच्या बक्षिसांचे रुपांतर मंदिरसेवेत मंडळाचे प्रमुख सदस्य महादेव चव्हाण यांच्या पुढाकारातून श्री जगदंबा देवी मंदिरासाठी सभामंडप उभारण्याचा संकल्प करण्यात आला. मंडळाच्या गाण्याच्या कार्यक्रमांतून मिळणारी बक्षिसांची रक्कम जतन करून मंदिरासाठी ती खर्च करण्यात आली. त्यामुळे भाविकांना धार्मिक कार्यक्रम, आराधना आणि विविध सोहळ्यांसाठी उपयोगी पडणारा सभामंडप उपलब्ध झाला आहे. या उपक्रमात अश्रुबा चौधरी, भीमराव कदम, राजाभाऊ कुंभार, महादेव साठे, श्रीमंत आबा गाडे, गोवर्धन माळी, महेश बागडे यांच्यासह मंडळातील सदस्यांचे योगदान आहे.


देवाच्या चरणी भक्ती समाजासाठी कृती

देवावर श्रद्धा ठेवणे ही भावना आहे; मात्र त्या श्रद्धेतून देवाच्या मंदिरासाठी प्रत्यक्ष काहीतरी करणे ही सेवाभावाची कृती आहे. चव्हाण आराधी मंडळाने आपल्या 50 वर्षांच्या वाटचालीत हीच भावना जपली आहे. श्री जगदंबा देवी मंदिराच्या परिसरात उभा राहिलेला हा सभामंडप चव्हाण आराधी मंडळाच्या अर्धशतकाच्या भक्तीची आठवण करून देत राहणार आहे. त्यामुळे मंदिराचे पुजारी धनंजय सुपेकर, संताजी सुपेकर आभार मानले.

 
Top