धाराशिव (प्रतिनिधी)- प्रत्येक पात्र नागरिकाचा घटनात्मक मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम प्रभावीपणे राबविली जावी, या उद्देशाने काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिवच्या वतीने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये BLA प्रतिनिधींची भव्य प्रशिक्षण शिबिरे आणि संघटनात्मक बैठका उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या शिबिरांमधून "कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही" हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

२९ जून रोजी धाराशिव–कळंब आणि भूम–परंडा–वाशी, ३० जून रोजी तुळजापूर तर १ जुलै रोजी उमरगा–लोहारा विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रशिक्षण शिबिरांना BLA प्रतिनिधी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. प्रत्येक ठिकाणी SIR अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक नियोजन, मार्गदर्शन आणि जबाबदाऱ्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉ. रेखाताई चव्हाण आणि डॉ. स्मिताताई शहापूरकर यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करताना मतदार पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया, नवीन मतदार नोंदणी, नावांतील त्रुटी दूर करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचून त्याचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्यासाठी BLA प्रतिनिधींनी अत्यंत जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षकांनी सांगितले की, मतदार यादी हा केवळ निवडणुकीचा दस्तऐवज नसून लोकशाहीवरील जनतेच्या विश्वासाचा पाया आहे. त्यामुळे कोणत्याही पात्र नागरिकावर अन्याय होणार नाही, कोणाचाही मतदानाचा अधिकार हिरावला जाणार नाही आणि मतदार यादी अचूक, पारदर्शक व विश्वासार्ह राहील, यासाठी प्रत्येक BLA प्रतिनिधीने गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर आणि घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याची गरज आहे.लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी BLA प्रतिनिधींवर असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

धाराशिव येथे काँग्रेस भवन कार्यालयात झालेल्या प्रशिक्षण शिबिरासह भूम,तुळजापूर, आणि उमरगा–लोहारा विधानसभा मतदारसंघातील प्रशिक्षणांमध्येही कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. आगामी काळात SIR अभियान लोकसहभागातून अधिक प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत सुनिश्चित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

चारही विधानसभा मतदारसंघांतील प्रशिक्षण शिबिरे यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, BLA प्रतिनिधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध परिश्रमांचे यावेळी कौतुक करण्यात आले. जिल्हाभर SIR अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी काँग्रेस संघटना सज्ज असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

 
Top