तुळजापूर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना लवकरच बिलासपूर येथे आमंत्रित करून मराठा समाजाचा भव्य-दिव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. समाज संघटन आणि सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. असे प्रतिपादन बिलासपूर मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष शशांक चव्हाण यांनी केले. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर मराठा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पुनर्निवड झाल्यानंतर शशांक चव्हाण यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात येऊन मनोभावे पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांनी विधिवत यात्रा सांग पूजन करून मातेचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
त्यांच्या पूजेचे पौरोहित्य पुजारी प्रवीण नरहरी कदम-केशव यांनी केले. या धार्मिक सोहळ्यास छत्तीसगडमधील विविध जाती-धर्मातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शशांक चव्हाण यांनी बिलासपूरमध्ये मराठा समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याबरोबरच श्री तुळजाभवानी मंदिर आणि श्री खंडोबा मंदिराच्या उभारणीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची सलग दुसऱ्यांदा बिलासपूर मराठा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल तुळजापुरात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, श्री भवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कदम आणि पुजारी नागेश इंगळे यांनी शशांक चव्हाण यांना फेटा बांधून व स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.
शशांक चव्हाण पुढे म्हणाले, ‘श्री तुळजाभवानी माता ही मराठा समाजासह संपूर्ण हिंदू समाजाची कुलस्वामिनी आहे. मातेच्या दर्शनातून समाजकार्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यामुळे दरवर्षी तुळजापुरात येऊन मातेचे दर्शन घेण्याचा आम्ही कटाक्षाने प्रयत्न करतो. तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर शशांक चव्हाण यांनी मंदिर परिसरात उपस्थित भाविकांशी संवाद साधला.
