धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला आणखी एक मानाचा तुरा लाभला असून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांना प्रतिष्ठेचा “प्रिन्सिपल ऑफ द इयर“ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. डॉ. प्रशांत जैन यांना “आयसोमेट्रिक रेखाचित्रासाठी लंबवर्तुळ रेखांकन टेम्प्लेट“ या अभिनव संशोधनासाठी डिझाईन पेटंट प्राप्त झाले आहे. या दुहेरी यशाबद्दल महाविद्यालयात सर्व विभागांच्या वतीने दोन्ही मान्यवरांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संशोधन निबंध प्रकाशित करून संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटविला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन संस्कृती, उद्योगाभिमुख शिक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने शैक्षणिक, संशोधन आणि गुणवत्ता वृद्धीच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या या सर्वांगीण योगदानाची दखल घेत त्यांना “प्रिन्सिपल ऑफ द इयर“ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. प्रशांत जैन यांनी विकसित केलेल्या “आयसोमेट्रिक रेखाचित्रासाठी लंबवर्तुळ रेखांकन टेम्प्लेट“ या संशोधनाला भारत सरकारकडून डिझाईन पेटंट प्राप्त झाले आहे. अभियांत्रिकी रेखाचित्र अधिक अचूक, सुलभ व परिणामकारक बनविण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार असून अभियांत्रिकी शिक्षणाच्या गुणवत्तेत भर घालणारे आहे.
दोघांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशानिमित्त नुकताच त्यांचा प्रा.सुनिता गुंजाळ, बी फार्मसी च्या विभागप्रमुख डॉ.प्रीती माने, स्थापत्य अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा.शितल पवार, आर. एल. मुंढे, बी जी सिरसट,डी आर जाधव, सविता नलावडे,सुक्षमा टेकाळे, संभाजी धत्तुरे,सुनीता कुंभार यांनी या दोघांचाही विशेष सन्मान केला. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांनी या यशामुळे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधन परंपरेला नवी दिशा मिळाली असून संस्थेच्या लौकिकात मोलाची भर पडल्याची भावना व्यक्त केली. दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा गौरव हा संपूर्ण तेरणा परिवारासाठी अभिमानाचा क्षण असून, भविष्यातही संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून महाविद्यालय राष्ट्रीय स्तरावर नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
