धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात घरगुती, शेतकरी तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या घरांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सुरू असलेली प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

स्मार्ट मीटर बसविल्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असून, वीज वापर आणि बिलिंग प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतही नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांचे हित, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा तसेच नागरिकांच्या भावना यांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

वीज ग्राहकांच्या हिताला बाधा पोहोचणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शासनाने नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व शंकांचे निरसन करावे आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. दरम्यान, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि वीज ग्राहकांच्या हक्कांसाठी तसेच त्यांच्या हिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला जाईल. जनतेच्या हक्कांसाठी आणि हितासाठी आमचा लढा यापुढेही कायम सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


 
Top