तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील सलगरा-दिवटी परिसरात एका पवनचक्कीच्या वरच्या भागाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेकडो फूट उंचीवरील पात्यांजवळ आग भडकत असल्याने तुळजापूर नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र अग्निशामक वाहनावरील अवघी 33 फुटांची शिडी असल्याने आगीपर्यंत पोहोचणेच अशक्य ठरले. त्यामुळे अग्निशमन दलालाही अक्षरशः हतबल होऊन पाहत राहावे लागले.
प्राथमिक माहितीनुसार, पवनचक्कीच्या वरच्या भागातील पात्यांजवळ असलेल्या यांत्रिक बॉक्समध्ये अचानक आग लागली. उंचीमुळे आग विझविण्यास कोणतेही प्रभावी साधन उपलब्ध नसल्याने आग काही काळ धुमसत राहिली. अखेर संबंधित बॉक्स पूर्णपणे जळून गेल्यानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली. घटनेची माहिती मिळताच तुळजापूर नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पवनचक्कीची उंची आणि उपलब्ध साधनसामग्रीतील मर्यादा यामुळे प्रत्यक्ष आग विझविणे शक्य झाले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पवनचक्कीचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या पवनचक्क्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पवनचक्कीच्या परिसरात शेतकरी, नागरिक आणि कामगारांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत उंचीवर लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक यंत्रणांकडे आवश्यक आधुनिक उपकरणे नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
