धाराशिव (प्रतिनिधी)- जंतरमंतर, नवी दिल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अभिजित दिपके व त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराचा मानवी हक्क अभियान, धाराशिवच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे, त्यांना अटक करणे व गुन्हे दाखल करणे हे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर न्याय्य निर्णय घेणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले. मानवी हक्क अभियानाने विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेणे, अटक केलेल्या विद्यार्थ्यांची बिनशर्त मुक्तता करणे, जखमींना मोफत उपचार व नुकसानभरपाई देणे, लाठीमाराचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणे, तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची जोरदार मागणी केली आहे.

“विद्यार्थ्यांवर दडपशाही करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. सरकारने तातडीने कारवाई न केल्यास मानवी हक्क अभियानाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र लोकशाही आंदोलन छेडले जाईल,“ असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत वाघे, जिल्हा कार्याध्यक्ष खालीद पटेल, जिल्हा मुख्य सल्लागार अरुणकुमार माने, धाराशिव तालुका अध्यक्ष जनार्दन वाळवे, तुळजापूर तालुका अध्यक्ष तानाजी खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड आणि जिल्हा सल्लागार आर.डी. राऊत,कैलास कांबळे, उमरगा तालुका अध्यक्ष शिवकांत गायकवाड,संतकुमार नवले राहुल लांडगे,रमेश गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top