धाराशिव (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात जीर्णोद्धार व विविध विकासकामे सध्या प्रगतिपथावर आहेत. भाविकांना सुरक्षित, सुलभ व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानामार्फत आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. तथापि, सुरक्षेच्या दृष्टीने तसेच दर्शन व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करण्यासाठी दर्शनासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागू शकतो.

याशिवाय, आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी भाविकांसह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी वाढून दर्शनासाठी प्रतीक्षा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात "May I Help You"  पथक कार्यरत असून, या पथकामार्फत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच हरवलेल्या भाविकांना आवश्यक मदत, दर्शन मार्गदर्शन, विविध सुविधांची माहिती आणि इतर आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच दर्शन मंडपातील प्रत्येक मजल्यावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.

मंदिर परिसरात भाविकांची गर्दी अत्यधिक वाढल्यास सुरक्षेच्या कारणास्तव व दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी धर्मदर्शन रांग, मुखदर्शन रांग तसेच रुपये 300 देणगी दर्शन रांग काही कालावधीसाठी तात्पुरती थांबवण्यात येऊ शकते. गर्दी कमी झाल्यानंतर संबंधित दर्शन व्यवस्था तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात येईल. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे सर्व भाविकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने मंदिर प्रशासनास सहकार्य करावे व मंदिर प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

 
Top