धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील धारासूर मर्दिनी कमानीजवळ किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यावेळी एका मोटार सायकलचे नुकसान झाले असून, एका महिलेच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण पसरताच पोलिस अधीक्षक रितू खोखर सह शीघ्र कृती दल दाखल झाल्यामुळे तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. यातच धारासूर मर्दिनी कमानीजवळ खाजानगर मधील एक गट व इंगळे गल्लीमधील एक गट यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर अचानक एका गटाने दगडफेक चालू केल्यामुळे दुसऱ्या गटानेही दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले. पोलिस विभागास माहिती मिळताच तातडीने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दराडे, आनंद नगर पोलिस ठाण्याचे खांडेकर, उपविभागीय अधिकारी राऊत, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलिस अधीक्षक रितू खोखर धारासूर मर्दिनी कमानीजवळ दाखल झाले. मोठ्या प्रमाणात पोलिस पथक दाखल झाल्यामुळे दोन गट पसार झाले. 


पोलिस चौकी उभारणार

यावेळी पोलिस अधीक्षक रितू खोखर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, किरकोळ कारणावरून दोन गटात दगडफेक झाली असून, पूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. याभागात नेहमीच अशा घटना होत असल्यामुळे पोलिस चौकी उभारण्याचा प्रस्ताव लवकरच पाठवणार आहे असे सांगितले. 

 
Top