धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित एमएचटी-सीईटीपरीक्षा प्रक्रियेत गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित घोटाळा व अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती प्रक्रियेत झालेल्या गंभीर अनियमिततेची राज्यस्तरीय चौकशी करून सदर पदोन्नती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. या मागण्यांसाठी दि. 28 जुलै रोजी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत संबंधित मंत्र्यांना निवेदने सादर करण्यात आली.
एमएचटी-सीईटी संदर्भातील निवेदनात परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संभ्रम व असंतोष निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करावे तसेच भविष्यात परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
तर दुसऱ्या निवेदनात धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती प्रक्रियेत शासनाचे नियम, निर्देश तसेच न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष करून पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेची राज्यस्तरीय उच्चस्तरीय चौकशी करून दिनांक 3 जुलै 2026 रोजी राबविण्यात आलेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, नव्याने पारदर्शक पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया राबवावी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, विनोद वीर, अग्निवेश शिंदे, सरफराज काजी, संजय गजधने, बाबा मोमीन आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
