उमरगा (प्रतिनिधी)-  शासनाच्या अनेक योजना आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून प्रशासन गतिमान आली लोकाभिमुख करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाला लाभ देण्याचे काम करत आहे. असे प्रतिपादन आमदार बसवराज पाटील यांनी केले.

दि. 22 जुलै रोजी उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, महाआरोग्य शिबिराचे संयोजक शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी सागर नन्नवरे, तहसीलदार गोविंद येरमे, तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर, तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व नगर पालिका सदस्यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

आमदार स्वामी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष गावात देण्यात आला आहे. 37 भूकंपग्रस्त गावांच्या नूतनीकरण व मूलभूत सुविधेसाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांचेही मार्गदर्शन झाले. यावेळी मंचावरून मान्यवरांच्या हस्ते विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे, धनादेश तसेच आवश्यक दस्तावेज वाटप करण्यात आले. प्रास्ताविक उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले.उपस्थितांचे आभार तहसीलदार गोविंद येरमे यांनी मानले. नागरिकांनी महाआरोग्य शिबिरातून आपली आरोग्य तपासणी मोठ्या संख्येने करून घेतली. 

 
Top