धाराशिव (प्रतिनिधी)- खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना 2026-27 अंतर्गत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील विविध विकासकामांसाठी तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून संबंधित वस्त्यांमधील पाणीपुरवठा योजना, पोहोच रस्ते व अंतर्गत रस्ते, गटारे बांधकाम, स्मशानभूमी विकास, पथदिवे उभारणी तसेच इतर आवश्यक मूलभूत नागरी सुविधांची विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारसंघातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील मूलभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.
सामाजिक न्यायाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा सर्वसमावेशक आणि समतोल विकास साधण्याच्या उद्देशाने खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विकास आणि प्रत्येक वस्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचविण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आभार मानले.
