धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता सिद्ध करणे ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. ज्या घरात गुणवत्ता तेच घर आज सदन मानले जाते. छत्रपती शिवाजी हायस्कूलने भाई उद्धवराव पाटील यांच्या प्रेरणेतून आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे. तर भारतीय लोकशाहीतही गुणवत्तापूर्ण वैचारिक, नैतिक व आदर्श राजकीय वारसा भाई उद्धवराव पाटील यांनी महाराष्ट्राला दिला आहे असे माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी बोलताना सांगितले.

भाई उद्धवराव पाटील पुण्यतिथीनिमित्त रविवारी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी डॉ. रमेश दापके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शशिकलाताई घोगरे होत्या. प्रसंगी कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख, उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, माजी मुख्याध्यापक बुवासाहेब देशमुख, शैलजा देशमुख, प्राचार्य विक्रमसिंह देशमुख, उपप्राचार्य बालाजी कुंभार, आदर्श प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक के.बी. घोडके, पर्यवेक्षक अमोल दीक्षित आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विचार, लेखन व वाचन स्वातंत्र्य ठेवायला हवे. स्वतःला आत्मविश्वासाने व्यक्त होता यावे अशी जडणघडण विद्यार्थ्यांची व्हावी असे संस्थेचे कार्याध्यक्ष एम.डी. देशमुख यांनी बोलताना सांगितले. सध्याचा काळ आव्हानांचा आहे. भाई उद्धवराव पाटील व भाई नरसिंहराव देशमुख यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामाजिक व राजकीय चळवळ उभी केली त्यांच्या इतिहासातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे सचिव भाई धनंजय पाटील यांनी बोलताना सांगितले. गोरगरीब, शेतकरी, सर्वसामान्यांच्या मुलांसाठी शिक्षण देण्याचे काम शाळेतून मधून केली जाते. विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न व्हावे असे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्रीमती शशिकलाताई घोगरे यांनी सांगितले.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रशालेतील इयत्ता दहावी, बारावी शालांत परीक्षा, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ,राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व गुलाब पुष्प देऊन पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक अमोल दीक्षित यांनी केले. सुत्रसंचलन आण्णासाहेब कुरुलकर यांनी केले. तर आभार उपप्राचार्य बालाजी कुंभार यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक पालक व नागरिक उपस्थित होते.

 
Top