कळंब (प्रतिनिधी)- समाजसेवा, नेतृत्व आणि गुणवंतांचा सन्मान या रोटरीच्या परंपरेला यंदाही उजाळा मिळणार असून, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व इनर व्हील क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता श्री महावीर भवन, कथले चौक, कळंब येथे पदग्रहण व 'कळंब भूषण' पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या अध्यक्षपदी रो.रवी नरहिरे तर सचिवपदी रो.अभिजीत भिसे पदभार स्वीकारणार आहेत. तसेच इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.पूर्वा पोरे व सचिव सौ.स्वाती राजमाने यांचाही पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी प्रा.माया सूर्यकांत मुळे (शिराढोण) या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार असून, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट रो.सतीश लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यावर्षीच्या समारंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्र राज्यपाल परिवाराचे प्रबंधक डॉ. निशिकांत श्रीधरराव देशपांडे यांना त्यांच्या चार दशकांहून अधिक कालावधीतील उल्लेखनीय प्रशासकीय, विकासाभिमुख आणि लोकहितवादी कार्याबद्दल 'कळंब भूषण' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष रो.डॉ.अभिजीत जाधवर, सचिव रो.श्याम जाधवर तसेच इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा प्रा.प्रतिभा भवर व सचिव डॉ.दिपाली लोंढे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून कळंब शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला जाणार आहे.

महसूलपासून राज्यपाल भवनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

शैक्षणिक गुणवत्तेपासून प्रशासकीय सेवांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. निशिकांत देशपांडे यांनी एमपीएससीद्वारे तालुका भूमी अभिलेख निरीक्षक, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशी विविध पदे मिळवत प्रशासकीय सेवेत भक्कम स्थान निर्माण केले. त्यांनी उपजिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेड महापालिकेचे आयुक्त, विविध मंत्र्यांचे स्वीय सचिव तसेच सध्या महाराष्ट्र राज्यपाल परिवाराचे प्रबंधक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. महसूल प्रशासन, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, नगर प्रशासन आणि ई-गव्हर्नन्स या क्षेत्रात त्यांनी राबविलेल्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला आहे. अनेक वेळा 'बेस्ट डेप्युटी कलेक्टर', राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार, राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान, स्कॉच ई-गव्हर्नन्स पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


'कळंब भूषण' सन्मान का विशेष?

कळंब परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीतर्फे 'कळंब भूषण' पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा हा बहुमान राज्य प्रशासनात उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविणारे डॉ. निशिकांत देशपांडे यांना जाहीर झाल्याने कळंबच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. त्यांच्या सन्मानामुळे प्रशासकीय सेवेत कार्यरत तरुण अधिकारी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. 


 
Top