भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी दि. 6 जुलै रोजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात पार पडली. सभेला मुख्याधिकारी शैला डाके यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विकासकामे, घनकचरा व्यवस्थापन, कंत्राटी कर्मचारी नियुक्ती, विद्युत व्यवस्था, विविध सभागृहांचे भाडे निश्चिती तसेच आगामी विकास आराखड्यासंदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरातील नागरिकांना गेल्या एक महिन्यापासून भेडसावत असलेल्या कचरा प्रश्न आहे मार्ग निघालेला आहे
सभेत शहरासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी घनकचरा व्यवस्थापनाची निविदा, कुशल व अकुशल कंत्राटी कर्मचारी नियुक्ती, तसेच विद्युत दुरुस्ती व देखभाल संदर्भातील निविदा मंजूर करण्यात आल्या. या निर्णयामुळे शहरातील स्वच्छता व मूलभूत नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सभेत नगरपरिषदेच्या मालकीच्या सभागृहांचे व सुविधांचे नवीन भाडेदरही निश्चित करण्यात आले. दरम्यान, काही विषयांवरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले असले तरी अखेर सर्व विषयांवर चर्चा करून अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. या सभेला नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, मुख्याधिकारी शैला डाके, आलम प्रभू विकास आघाडीचे सहा नगरसेवक तसेच जनशक्ती नगर विकास आघाडीचे 15 नगरसेवक उपस्थित होते. सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारून दोन्ही गटातर्फे पत्रकार परिषद घेवून माहिती देण्यात आली.