तुळजापूर (प्रतिनिधी)-  नगरपरिषद पाठीमागील सार्वजनिक जागा वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांच्या नेतृत्वाखाली जवाहर गल्ली परिसरातील स्त्री-पुरुष रहिवाशांनी सोमवारी (दि. 6) नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले. या प्रश्नाची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. दरम्यान, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी लेखी पत्र देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.

जवाहर गल्लीतील सिटी सर्व्हे क्रमांक 972 मधील एकूण 2364.30 चौ.मी. जागेपैकी 731 चौ.मी. जागा भाजी मंडई व इतर सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपलब्ध कागदपत्रांनुसार, 30 नोव्हेंबर 1978 रोजी संबंधित जागेचे कायदेशीर भूसंपादन करण्यात आले असून त्याचा मोबदला भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला होता, असेही त्यांनी नमूद केले.

या जागेवर पूर्वी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले होते, तर उर्वरित जागा भाजी मंडईसाठी वापरात होती. मात्र, भूसंपादन झालेली व पंचनाम्याद्वारे नगरपरिषदेच्या ताब्यात आलेली जागा मूळ मालकास देऊन त्याठिकाणी व्यापारी संकुल व लॉजिंगसाठी बांधकाम परवानगी देण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

नगर रचनाकार, धाराशिव यांच्या वारंवार पत्रव्यवहारानंतरही काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वस्तुस्थिती लपवून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. संबंधित अधिकारी व नगर अभियंत्यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता अथवा माहिती असूनही बांधकाम परवानगी दिल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, बांधकाम परवाना रद्द करावा आणि 731 चौ.मी. जागा नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन सार्वजनिक वापरासाठी खुली करावी, अशी मागणी करण्यात आली.


रहिवाशांच्या मागणीनुसार येथे सभागृह उभारण्यासाठी प्रयत्न करणार नगरसेविका -प्रियंका ताई गंगणे 

उपोषणस्थळी प्रभाग क्रमांक 10 च्या नगरसेविका प्रियंका विजय गंगणे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. “या ठिकाणी पूर्वी महिलांसाठी स्वच्छतागृह होते; ते सध्या बंद आहे. परिसरातील नागरिकांची येथे सभागृह उभारण्याची मागणी आहे. हा विषय नगरपरिषद बैठकीत मांडला असून मुख्याधिकाऱ्यांकडेही पत्रव्यवहार केला आहे. काही लोकांच्या भ्रष्टाचारामुळे हे काम रखडले. मात्र, रहिवासी व सर्वांच्या सहकार्याने येथे सभागृह उभारून मतदारांची मागणी पूर्ण करणार,” अशी भूमिका त्यांनी मांडली.


सदर प्रकरणाची सखोल चौकशी करणार- मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे 

दरम्यान, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी जयकुमार पांढरे यांना दिलेल्या पत्रात संबंधित जागेच्या प्रकरणातील कागदपत्रे प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून विषय नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येईल आणि सभेच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.


या लाक्षणिक उपोषणात जयकुमार नागनाथ पांढरे, अमरीश भैय्या जाधव, शहाजी काका भांजी, विकास शिंदे यांच्यासह जवाहर गल्लीतील महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपोषणाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे, माजी नगरसेवक अंबरीश जाधव, बाजार समितीचे उपसभापती सुहास गायकवाड, नगरसेविका प्रियंका गंगणे, अमृता दादासाहेब खपले, माजी नगरसेवक नागनाथ भांजी, उत्तम अमृतराव, विशाल शिंदे, शहाजी भांजी, प्रमोद भोरे, वनिल हंगरकर, सचिन काळे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला.


 
Top