येरमाळा (प्रतिनिधी)- येरमाळा व परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वारंवार वीजखंडितीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या येरमाळा उपविभागाला ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विदर्भातुन पंढरपुरकडे जाणाऱ्या सर्व पायी वारकरी दिंड्या येरमाळा मार्गे जातात आणि त्यापैकी अनेक दिंड्या येरमाळ्यात मुक्कामी असतात. अशावेळी होणाऱ्या रात्रीच्या सततच्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असून, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनाही विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.

येरमाळा हे महत्त्वाचे केंद्र असूनही या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येत्या 48 तासांत वीजपुरवठा नियमित व सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर राहुल पाटील, लहु बारकुल, नदीम मुलाणी, अशोक साळुंके, शरद बारकुल, दत्ता कसपटे, यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


येरमाळा मार्गे दरवर्षी विदर्भातून पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकरी दिंड्यांचे ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने स्वागत करतात. वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, भोजन व मुक्कामाची व्यवस्था उत्साहाने केली जाते. मात्र, महावितरणच्या वारंवार होणाऱ्या वीजखंडितीमुळे वारकरी तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.  राहुल पाटील, ग्रामस्थ


 
Top