तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत जिल्हा पोलीस मुख्यालया मार्फत डॉ. इकबाल महेबूब सय्यद उपनिरीक्षक एस पी सी डी एन ओ धाराशिव आणि पोलीस नाईक आतिश दशरथ सारफळे, मदतनीस यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थी सुरक्षा समिती तथा सखी सावित्री समिती अंतर्गत तक्रार निवारण समिती च्या कार्यप्रणालीची तपासणी करून समाधान व्यक्त केले. शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती, सखी सावित्री समिती आणि तक्रार निवारण समिती कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेकरिता या समित्यांचे नियंत्रण शाळा स्तरावर केले जात आहे. सुरक्षित, भयमुक्त व आनंददायी वातावरण निर्मितीसाठी विद्यार्थी हित लक्षात घेता या समित्यांची रचना करण्यात आलेली आहे. शाळेमध्ये सदर समित्या अंतर्गत कशा प्रकारे काम चालू आहे याची पाहणी करण्याकरिता पोलीस मुख्यालया मार्फत शाळांना भेट देऊन तपासणी केली जात आहे. त्या अनुषंगाने डॉ. सय्यद व सारफळे यांनी शाळेत भेट देऊन सर्व समित्यांच्या कार्यप्रणालीची तपासणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय योजना सुचविल्या. विद्यार्थी व शाळा सुरक्षेसाठी कोणकोणत्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वात शेवटी मुख्याध्यापक शहा तय्यबअली यांनी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
