धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू कराव्यात, कामगार विभागाने 13 जुलै रोजी काढलेला जी.आर. रद्द करावा तसेच कामगारांवरील अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी कामगार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास 3 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे सर्व कामगार संघटनांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांवर निर्बंध घालण्यात आले असून त्यामुळे लाखो नोंदणीकृत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होत आहे. विशेषतः कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या 21 प्रकारच्या शैक्षणिक सहाय्य योजना बंद करण्यात आल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत आहे. पहिली ते नववी, अकरावी, डिप्लोमा व पदवी अभ्यासक्रमासाठी देण्यात येणारी आर्थिक मदत तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, आरपीएल प्रशिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण न देता केवळ कागदोपत्री प्रशिक्षण दाखवून निधीचा अपव्यय केला जात असून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सैनिक लाभ योजनेतील कथित त्रुटी दूर करण्याबरोबरच प्रसूती व मृत्यू लाभ योजनांमधील जाचक अटी रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रसूती लाभ केवळ महिला कामगारांपुरता मर्यादित न ठेवता नोंदणीकृत पुरुष कामगारांच्या पत्नींनाही मिळावा, तसेच मृत्यू लाभासाठी असलेली सलग तीन वर्षांच्या नोंदणीची अट रद्द करून वारसांना लाभ देण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पेन्शन योजनेतील अटी शिथिल करून अधिकाधिक पात्र कामगारांना लाभ मिळावा, आरोग्य तपासणीच्या नावाखाली होणारा आर्थिक भार थांबवावा आणि कामगार विभागातील कथित भ्रष्टाचार व मनमानी कारभाराची चौकशी करावी, अशाही मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
शासनाने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 3 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे सर्व कामगार संघटनांच्या सहभागाने आनंद भालेराव यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर आनंद भालेराव, वासुदेव मांगले, श्रीहरी चव्हाण,बबन चव्हाण, नंदकुमार मनाळे,तानाजी गायकवाड, सुरज भालेराव,अगुल माने ,किरण आवटे, राजू सय्यद, बाळासाहेब माळी, शहाजी कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
