धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता निर्णायक गती मिळाली आहे. यंदापासूनच केंद्रीय विद्यालय सुरू व्हावे यासाठी आपले युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय विद्यालयासाठी आवश्यक असलेल्या जिल्हा परिषदेच्या तात्पुरत्या इमारतीसह कायमस्वरूपी जागेचीही अडचण दूर करण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेच्या (केव्हीएस) पथकाने गुरुवारी धाराशिवमध्ये अनुषंगिक बाबींची पाहणी पूर्ण केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

 केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे जागेचा प्रश्न होता. जागा उपलब्ध नसल्यामुळे हा विषय दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. मात्र, सौ. अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यात आला. सौ. अर्चना पाटील यांनीच जिल्हा परिषदेच्या मालकीची 25 वर्गखोल्या, ग्रंथालय, सुसज्ज सभागृह आणि पार्किंगसह तीन एकर जागा असलेली इमारत केंद्रीय विद्यालयासाठी देण्याचा प्रस्ताव दिला. जिल्हा परिषदेच्या मालकीची डीआयसी रस्त्यावरील डायटसमोरील सुसज्ज इमारत केंद्रीय विद्यालय तात्पुरत्या स्वरूपात तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाने मंजुरी दिली. या निर्णयामुळेच केंद्रीय विद्यालयाच्या प्रस्तावाला खरी गती मिळाली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. याचबरोबर विद्यालयासाठी कायमस्वरूपी आणि सर्व सुविधांनी युक्त जागा उपलब्ध व्हावी, यासाठीही आपण अजिबात वेळ न दवडता आवश्यक ती सर्व पावले उचलली. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसाहतीमागील गट नंबर 426 मधील सुमारे पाच एकर शासनाची जागा केंद्रीय विद्यालयासाठी योग्य असल्याचे आपण सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले. त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. त्यानुसारच धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय विद्यालय संघटनेला अधिकृत पत्र व्यवहार केला. त्याच अनुषंगाने गुरुवारी केव्हीएसचे पथक प्रत्यक्ष पाहणीसाठी आले होते. पाहणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत पथकासोबत सविस्तर चर्चाही झाली. जिल्हा परिषदेच्या वतीने अर्चना पाटील यांनी पथकाचे स्वागत केले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.


यावर्षीपासूनच विद्यालय सुरू व्हावे यासाठी प्रयत्न

केंद्रीय विद्यालयाची मान्यता, जागेची अंतिम मंजुरी आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया शक्य तितक्या वेगाने पूर्ण व्हाव्यात, यासाठी संबंधित सर्व विभागांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा सुरू असून, कोणत्याही कारणाने विलंब होऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, धाराशिवच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार केंद्रीय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा विश्वास व्यक्त करत, यावर्षीपासूनच केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून अंतिम मान्यता मिळेपर्यंत पाठपुरावा अधिक वेगाने सुरू राहील, असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top