धाराशिव  (प्रतिनिधी) - अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असून तो तात्काळ आणि ताबडतोब रद्द करण्यात यावा या मागणीसाठी धाराशिव येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप व रुक्मिणी लोंढे यांच्या उपस्थितीत दि.२८ जुलै रोजी महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गावागावांत बैठका घेऊन चांगल्या पद्धतीने जनजागरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे या मोर्चात अनुसूचित जातीमधील ५९ घटकांतील लाखो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे सदस्य धनंजय शिंगाडे व राजाभाऊ ओहाळ यांनी दि.२६ जुलै रोजी दिली.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे सदस्य नितीन शेरखाने, आनंद पंडागळे, विकास बनसोडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंगाडे म्हणाले की, आरएसएस व भाजप हे जाती-जातीमध्ये भांडण निर्माण करण्याचा घाणेरडा खेळ रचत आहेत.  मराठा व ओबीसी यांच्यात तर धनगर आणि बंजारा यांच्यामध्ये भांडणे लावली. ते शांत होत नाही तोच अनुसूचित जातीतील ५९ जातीतील मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा घाट घालून जाती-जातीमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र अवलंबले असल्याचा आरोप त्यांनी केला.

तर ओहाळ म्हणाले की, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात जनजागृती करण्यासाठी आठ तालुक्यांमध्ये आठ अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. हा मोर्चा धाराशिव शहरातील जिजाऊ चौकातून विविध मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या ठिकाणी या मोर्चास सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप व रुक्मिणीताई लोंढे यांच्यासह इतर मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे ओहाळ यांनी सांगितले. तर शिंगाडे म्हणाले की, जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, क्रांतीबा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे  अप्रकाशित साहित्य  उपलब्ध करून ते प्रकाशित करण्यात यावे, आदी मागण्या शिंगाडे यांनी केली.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top