धाराशिव (प्रतिनिधी)-  कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असूनही संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे अनेक वर्षे न्यायापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्याला अखेर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलासा दिला आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायटी वाघोली (वरूडा), ता. धाराशिव आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. उस्मानाबाद (धाराशिव) यांना आयोगाने फटकारत शेतकऱ्याच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

पवारवाडी (ता. धाराशिव) येथील शेतकरी पांडुरंग रामलिंग मुंढे व शालूबाई पांडुरंग मुंढे यांनी अनुक्रमे 3 एप्रिल 2014 रोजी ऊस पिकासाठी विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडून कर्ज घेतले होते. सन 2017 मध्ये राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू केली. त्यानुसार मुंढे दाम्पत्याने एकत्रित सहभाग नोंदवत 24 ऑगस्ट 2017 रोजी शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन अर्जही भरला होता. मात्र, सर्व पात्रता पूर्ण करूनही संबंधित सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चुकीमुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनीही नियमांनुसार कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत संबंधित संस्थांना पत्रव्यवहार केला होता. तरीदेखील कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

अखेर ॲड. धर्मराज नवनाथ सोनवणे यांच्या माध्यमातून मुंढे दाम्पत्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, धाराशिव येथे तक्रार दाखल केली. सुनावणीदरम्यान अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करून आपण कर्जमाफीस पात्र असूनही संबंधित संस्थांच्या चुकीमुळे लाभापासून वंचित राहिल्याचे सिद्ध केले. याची दखल घेत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने 30 जून 2026 रोजी अर्जदारांची तक्रार मंजूर केली. आयोगाने विविध कार्यकारी सेवा सोसायटी वाघोली (वरूडा) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना अर्जदारांच्या 3 एप्रिल 2014 च्या पीककर्जाबाबत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. याशिवाय, अर्जदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी 10 हजार रुपये तसेच तक्रारीच्या खर्चापोटी 10 हजार रुपये, असे एकूण 20 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही आयोगाने दिले आहेत. या प्रकरणात ॲड. धर्मराज नवनाथ सोनवणे यांनी अर्जदारांची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांना ॲड. प्रतिक्षा सारूक-सोनवणे व ॲड. सचिन डी. कांबळे यांनी सहकार्य केले. 

 
Top