धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिवच्या स्वसंपादित योजना सन 2026 अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ शुक्रवार, दि. 17 जुलै 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता पुष्पक मंगल कार्यालय, धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना भविष्यात अधिक उंच भरारी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई रविंद्र गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सभापती, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ.रवींद्र खंदारे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. रवींद्र खंदारे यांनी प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेच्या स्वसंपादित योजनेचा उद्देश, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यामागील भूमिका आणि शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सहाय्यक प्राध्यापक श्रीमती तन्वी अशोक मोरे (जय हिंद विद्यालय) यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणातील संधी, व्यक्तिमत्त्व विकास आणि यशस्वी आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.
यानंतर मउपाध्यक्षा उषाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर तसेच अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नेहमीच कटिबद्ध असून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने चालना दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले.
या समारंभात विविध शैक्षणिक घटकांतील एकूण 98 गुणवंत विद्यार्थी, शाळा व शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये
इयत्ता दहावी (मार्च 2026) मध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले 63 विद्यार्थी. इयत्ता दहावीमध्ये विविध विषयांत सर्वाधिक गुण मिळविणारे 8 विद्यार्थी. इयत्ता दहावीमध्ये विशेष गरजा असलेल्या सर्वाधिक गुण प्राप्त 4 विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान. फेब्रुवारी 2026 शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी व आठवी) मध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे 11 विद्यार्थी.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळविणारे 6 विद्यार्थी. इयत्ता दहावीमध्ये सर्वाधिक पटसंख्या व उत्कृष्ट निकाल प्राप्त 6 शाळांचा गौरव. अशा प्रकारे विविध श्रेणींतील एकूण 98 गुणवंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत अधिक प्रेरणा निर्माण झाली असून जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरळीत पार पडले. समारोपावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम यांनी उपस्थित सर्व मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
