धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव येथील स्थायी सभागृहात प्रदीर्घ कालावधीनंतर वर्ग-4 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी समुपदेशन प्रक्रिया पार पडली. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, नियोजनबद्ध व व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून पार पाडण्यात आली.

महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेल्या सर्व निकषांनुसार, संबंधित शासन निर्णयांनुसार  ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, संबंधित सर्व पदोन्नत कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम भालके यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदोन्नती प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. सेवाजेष्ठतेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांचे विकल्प घेऊन, तसेच ज्या ठिकाणी रिक्त पदे उपलब्ध होती त्या पदांचे विकल्प विचारात घेऊन ही पदोन्नती प्रक्रिया पार पडण्यात आली.

या प्रक्रियेमध्ये एकूण 56 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला. त्यामध्ये आरोग्य सेवक पदावर 37, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदावर 16, तर कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर 3 कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली. ही प्रक्रिया यशस्वी करण्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेषतः  उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांनी संपूर्ण प्रक्रियेचे प्रभावी नियोजन, मार्गदर्शन व समन्वय साधून पदोन्नती प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली.

याशिवाय प्रवीण खरसाडे (क.प्र.अ.), विजया सोनटक्के (स.प्र.अ.) तसेच विनोद गायकवाड (व.स.) यांनी आवश्यक माहिती संकलित करून, रिक्त पदांचा ताळमेळ साधत व प्रशासकीय समन्वय राखत ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील रिक्त पदांची माहिती संकलित करून त्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना न्याय व गुणवत्ताधारित पद्धतीने पदोन्नती देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना या प्रक्रियेमुळे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.


 
Top