तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर पोलिसांनी तुळजापूर-बार्शी मार्गावरील ढेकरी शिवारात केलेल्या कारवाईत 92 हजार 902 रूपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व मोटारसायकल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या कारवाईनंतर तीर्थक्षेत्र तुळजापूरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचे वितरण होत असल्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधाराला तातडीने जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 26 जुलै 2026 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ढेकरी शिवारातील राजवीर हॉटेलसमोर कारवाई करण्यात आली. यावेळी दिगंबर सोमनाथ मोटे (रा. खांडवी, ता. बार्शी) व आश्रुबा शंकर ताकभाते (रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी) यांच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला डायरेक्टर पान मसाला, राजनिवास, रजनीगंधा, विमल, बाबा-120, व्ही-1 सुगंधित तंबाखू, झेडएन जाफरानी जर्दा आदी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

या कारवाईत हिरो कंपनीची एमएच-13-सीवाय-6840 क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण 92 हजार 902  रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 व 3(5) अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top