भूम  (प्रतिनिधी)- भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत नागरिकांच्या वतीने पोलीस आयुक्त, परिक्षेत्र संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बदली करण्यात आली नाही, तर 14 ऑगस्टपासून भूम तालुका बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, भूमपरांडा रस्त्यावरील गतिरोधक प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई, ग्रामदैवत श्री अलमप्रभू देवस्थानातील पारंपरिक आरती बंद करून गुन्हे दाखल करणे, यात्रेतील व्यापाऱ्यांकडून मारहाण व कार्यक्रम बंद करण्याचे प्रकार, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त होणारे व्याख्यान रोखण्याचा प्रयत्न, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीवेळी समाजमंदिर परिसरात संचारबंदी लावून समाजाच्या भावना दुखावल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

याशिवाय अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, पारधी समाजाच्या कार्यक्रमात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप, काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून सामाजिक कार्यक्रमांचे व्हिडिओ चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंग केल्याची तक्रार, तसेच मटका, जुगार, अवैध दारू, गुटखा, गांजा, गोवंश तस्करी व ऑनलाइन जुगार यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.

खोट्या फिर्यादींवरून कारवाई करून नागरिकांकडून पैशांची मागणी, आरोपींना अटक टाळण्यासाठी आर्थिक व्यवहार, चोरीच्या घटनांचा तपास न करणे, महिला तक्रारदारांशी अयोग्य वर्तन, दूध भेसळ प्रकरणातील आरोपींना मदत, तसेच काही गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रभावी कारवाई न झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.

या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांची बदली करावी व भूम पोलीस ठाण्यात निष्पक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा 14 ऑगस्टपासून भूम तालुका बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विजयसिंहराजे थोरात, दिलीप शाळू महाराज, नगरसेवक रुपेश शेंडगे, चंद्रमणी गायकवाड,अनिल शेंडगे,विठ्ठल बागडे,नवनाथ रोकडे,रामराजे कुंभार,गणेश शाळू,रमेश मस्कर, हरिचंद्र ,विलास शाळू, संतोष सुपेकर, सिरज  मोगल, सुनील वीर यांच्या सह सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

 
Top