धाराशिव (प्रतिनिधी)- इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण सामाजिक व आर्थिक विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच त्याअंतर्गत कार्यरत 13 उपमहामंडळांची स्थापना केली असून,या महामंडळांचे जिल्हास्तरावरील कामकाज आता धाराशिव येथे सुरू करण्यात आले आहे.विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे यांनी केले आहे.
शासनाने विविध समाजघटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळांची स्थापना केली आहे. त्यामध्ये जग्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (लिंगायत वाणी),संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (गुरव समाज),संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (न्हावी समाज),लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ (लेवा समाज),सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ (लाडशाखीय वाणी/वाणी),स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ (लोणारी समाज),संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ (शिंपी समाज),संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ (सुतार समाज),सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ (गुजर समाज),संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ (सोनार समाज),संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (तेली समाज), संत श्री.रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (बारी समाज) आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ (आगरी समाज) यांचा समावेश आहे.
या महामंडळांमार्फत लाभार्थ्यांसाठी सहा योजना पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये थेट कर्ज योजना (रु.1 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज),20 टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना,गट कर्ज व्याज परतावा योजना,शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना आणि महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना यांचा समावेश आहे.या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने अर्जदारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या योजनांबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ,धाराशिव येथे संपर्क साधता येईल.तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02472-223863 वर संपर्क साधावा,असे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे यांनी कळविले आहे.