धाराशिव  (प्रतिनिधी)- हवा, पाणी आणि आई तुळजाभवानीमुळे ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. धाराशिवचे सुपुत्र मनोज औदुंबर मोरे आणि प्रताप राजेंद्र गायकवाड यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सहनिर्माते म्हणून दमदार पदार्पण करत 'खाशाबा' या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामुळे धाराशिवचे नाव मराठी चित्रपटविश्वात नव्या उंचीवर पोहोचणार आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते नागराज मंजुळे यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटात भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोलेश्वर गावचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकत भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी केली होती. मराठी मातीतल्या कुस्ती परंपरेतून घडलेल्या या महान मल्लाने जगाच्या रंगमंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. त्यांच्या या अद्वितीय कर्तृत्वाची प्रेरणादायी कहाणी 'खाशाबा' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

खाशाबा जाधव यांना कुस्तीचे प्राथमिक धडे त्यांचे वडील आणि नामांकित मल्ल दादासाहेब जाधव यांच्याकडून मिळाले. कठोर परिश्रम, जिद्द आणि देशासाठी काहीतरी करण्याची ज्वलंत इच्छा या बळावर त्यांनी ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. हा प्रेरणादायी प्रवास चित्रपटात वास्तववादी आणि भावस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे.


 
Top