आवाजाने माणसाची नम्रता कळते,वर्तनाने माणसाचे शिल समजते,माणसाची वाणी शुद्ध आणि सात्विक असावी. त्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये आदर वाढत असतो. दिलेले काम वेळेत आणि प्रामाणिकपणे पूर्ण केल्यास समोरची व्यक्ती नेहमी आपल्याबद्दल आदर व्यक्त करत असते , असे प्रत्येक सहवासातील व्यक्तीला सांगणारे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक व सध्या अहिल्यानगर येथे बढती झालेले प्रादेशिक सह संचालक (साखर) मा. किरणजी गायकवाड सर यांची सोलापूर येथून अहिल्यानगर येथे बढतीने बदली झाली.

गेल्या सोळा सतरा वर्षापासून त्यांचे आणि माझे खूप जवळचे आणि स्नेहाचे संबंध आहेत. सरांचा सहवास खूपच दृढ आणि सकस वैचारिक देवाणघेवाण करणारा आहे . त्यांनी प्रत्येक कार्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. यशाच्या शिखरावर असताना देखील ते कधीच पायाखालील दगडाला विसरले नाहीत. पेशाने इंजिनीयर असणारे किरण गायकवाड समाजाची सेवा करण्यासाठी प्रशासनामध्ये जाण्याचे ठरवून, स्पर्धा परीक्षेतील अनेक पदे मिळवली. कस्टम अधिकारी, डेप्युटी सीईओ, आदिवासी विकास विभागात उपनिबंधक, म्हणून त्यांनी काम केले आहे. आणि फेब्रु 2023 मध्ये सोलापूर येथे जिल्हा उपनिबंधक म्हणून रुजू झाले होते. सध्या त्यांची बढती होऊन अहिल्यानगर येथे प्रादेशिक सहसंचालक साखर या ठिकाणी रुजू होत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये तळागाळातील विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक प्रकारे मदत केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? हे माहीत नसते, त्यांच्याकडे वेगवेगळे क्लासेस लावण्यासाठी पैसे नसतात,पुस्तके घेण्यासाठी देखील अडचणी निर्माण होतात, म्हणून त्यांनी बार्शी या ठिकाणी ना नफा ना तोटा या तत्त्वावर आर्या करिअर इन्स्टिट्यूट सुरू केले , आणि गोरगरिबांची मुले मोठ्या प्रमाणावर या क्लासेस मधून बाहेर पडू लागली, आज या क्लासेस चे अनेक विद्यार्थी अधिकारी म्हणून समाजसेवा करताना दिसत आहेत.

हे करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानरूपी अमृत देताना तळागाळातील गरिबाच्या पोराला ज्ञानरूपी ताकद देण्याचा प्रयत्न केला. सरांची भाषण करण्याची कला खूपच छान आहे. काना मनाला वेड लावणारी त्यांची भाषा समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून टाकते. जीवनभर त्यांनी अधिकारी असताना देखील शिक्षणाला खूपच महत्त्व दिले .शिक्षणाने माणुस मोठा होतो,शिक्षणाने व्यक्तिमत्व घडते, आणि शिक्षणानेच आयुष्याला आकार मिळतो. अशा प्रकारची विचारांची पेरणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते करत असतात.  शिक्षक, मार्गदर्शक म्हणून त्यांना पहावयाचे झाल्यास स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांमध्ये पारंगत असणारे व सर्वत्र महाराष्ट्रात G.Kiran Sir या नावाने प्रसिद्ध असणारे गायकवाड सर महाराष्ट्रामध्ये गणिताच्या सखोल अभ्यासासाठी प्रसिद्ध आहेत आजपर्यंत त्यांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गणित विषयावर सात पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिसस्पर्शाचे काम करत असून त्यांचे सोने करताना दिसतात. 

सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा उपनिबंधक म्हणून सेवा करत असताना,अनेक वेळा पंढरपूर ,अक्कलकोट या ठिकाणी त्यांचे जाणे झाले. परंतु त्यांना देवाच्या मंदिरामध्ये कामाच्या व्यापामुळे जाता आले नाही. त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना मंदिरात झाण्याबद्दल विचारल्यास ते सहज त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. मला देव मंदिरात नाही तर रस्त्यावर भेटतो. पांडुरंग मला रस्त्यावर भेटायला येतो आणि मी देखील पांडुरंगाला रस्त्यावरच नमस्कार घालतो. गरिबांचा देव माझा पांडुरंग आहे असे म्हणून मला देव हा माणसात भेटतो ,शेतकऱ्यांच्या कष्टात दिसतो. माणसात देव पाहणार हा एकमेव अधिकाऱ्यातील देव माणूस मी पाहिला आहे.

शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ते खूपच हळवे आहेत. जिल्हा उपनिबंधक म्हणून काम पाहत असताना. त्यांना भेटण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला कोणाचीही शिफारस ची गरज न्हवती, प्रत्येक व्यक्तीची समस्या समजून घेऊन ती कायदेशीररीत्या सोडवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करून न्याय देत. काळ्या मातीत हात कुस्करून, हिरवं मोती जन्मला घालणाऱ्या शेतकऱ्याचा मिसरूट फुटलेला पोरगा फौजदाराची टोपी घालून ताठ मानेने समाजाची सेवा करण्यासाठी बाहेर पडावा असे त्यांना मनोमणी वाटते.  माणसात देव पाहणाऱ्या ह्या अधिकाऱ्याला नेहमीच शेतकऱ्यात, गोरगरिबा मध्ये, सर्व सामान्य जनतेमध्ये देव दिसला.., रोज रात्री 8 वाजेपर्यंत ऑफिस मधे बसून जन सामन्याचे प्रश्न सोडविणारा स्वभावाने खूपच शिस्तप्रिय आणि मनाने हळवा असणारा अधिकारी मी गायकवाड सर मधे पाहिला आहे. ते सध्या अहिल्यानगर येथे प्रादेशिक सहसंचालक साखर या पदावर रुजू होत आहेत. पुढील कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा...



प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे

(9730961816)

(अर्थशास्त्र विभाग प्रमुख , रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव).

 
Top