धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे. जळकोट येथील एका भांड्यांच्या दुकानात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, लातूर जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 1 लाख 70 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 4 जून 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचूक सापळा रचला. या कारवाईमुळे नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा (गुरनं 276/26 क 331 (4), 305(अ) तपास लागला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) कासार आणि त्यांच्या पथकाने नरसिंग दत्तू माने (वय 35 वर्षे, रा. तगरखेड, ता. निलंगा, जि. लातूर) या सराईत गुन्हेगारावर पाळत ठेवली आणि त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या इतर साथीदारांची नावेही सांगितली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यातील सर्व आरोपी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी जळकोट येथील दुकानातून चोरीस गेलेली पितळी आणि तांब्याची भांडी, तसेच दोन एलईडी टीव्ही असा एकूण 1,70,055 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, पोलीस कॉन्स्टेबल शुभम बिराजदार आणि चालक पोलीस हवालदार नागनाथ गुरव यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
