मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील रसायनशास्त्र विभागातील एम.एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी ओमकार इंद्रजीत चव्हाण याने जून 2026 मध्ये झालेल्या CSIR JRF-NET परीक्षेत 99.87 पर्सेंटाइल गुण मिळवत देशात 21 वा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माकणीचे प्राचार्य डॉ डी व्ही माने, उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, रसायनशास्त्र विभागप्रमुख व मार्गदर्शक डॉ. पी. ए. पीटले, डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय अस्वले म्हणाले की, महाविद्यालयात नियमित शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा, NET-SET आणि संशोधनाभिमुख मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमितपणे महाविद्यालयात उपस्थित राहून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यास उज्ज्वल करिअर घडविण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
ओमकार चव्हाण यास Council of Scientific and Industrial Research (CSIR) ची प्रतिष्ठेची Junior Research Fellowship (JRF) मंजूर झाली असून, यामुळे त्याला भारतातील विविध राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळांमध्ये उच्च शिक्षण व संशोधन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच तो सहाय्यक प्राध्यापक पदासाठीही पात्र ठरला आहे. ओमकारच्या या दैदिप्यमान यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष (भैय्या) मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकरराव हराळकर, सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे तसेच संस्थेच्या संचालक मंडळाने त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
