नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या
निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांचे निर्देश

धाराशिव,दि.३ जून (जिमाका) उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणूक २०२६ साठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे.निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही निवडणूक निर्भय,नि:पक्षपणे आणि मुक्त वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी,असे निर्देश निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बुधवारी (दि.३) विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, संतोष राऊत,श्रीमती.स्वाती शेंडे,श्रीमती. अरुणा गायकवाड,धाराशिव उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,धाराशिव तहसीलदार डॉ.मृणाल जाधव,पोलीस निरीक्षक अमोघ भुजबळ उपस्थित होते.तसेच ऑनलाइन पद्धतीने बीडच्या प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके,लातूरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके,बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे सहभागी होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना श्री.बोरकर म्हणाले की,राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी या निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.त्यामुळे तीनही जिल्ह्यांतील सूक्ष्म निरीक्षकांच्या याद्या मागवून घ्याव्यात.मतदान साहित्य वितरण व स्वीकृती केंद्राचे काम योग्य प्रकारे पार पाडावे.मतपेट्या सुरक्षितपणे मतदान केंद्रावर पोहोचविणे तसेच मतदानानंतर सीलबंद मतपेट्यांची वाहतूक कडक सुरक्षा व्यवस्थेत करावी.या प्रक्रियेत कोणतीही उणीव राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.असे ते म्हणाले.

मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रियेची वेळोवेळी माहिती संकलित करण्यात यावी असे सांगून श्री.बोरकर म्हणाले की, मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात यावे.मतदान केंद्र तहसील कार्यालयात असल्याने दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था उपलब्ध असावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी.आचारसंहितेच्या अंमलबजावणीत दक्ष राहून काम करावे.प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे नि:पक्षपाती राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे,असेही श्री.बोरकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले की,सर्व मतदान पथकांना तीनही टप्प्यांतील प्रशिक्षण व्यवस्थित व परिपूर्ण पद्धतीने देण्यात यावे.तसेच आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी निवडणुकीची माहिती देताना सांगितले की,या निवडणुकीत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे ६३ व लातूर जिल्हा परिषदेचे ६९ असे एकूण १३२ मतदार आहेत.लातूर महानगरपालिकेचे ७७ मतदार,बीड जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे ३०४,लातूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे २२१ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींचे २५४ असे एकूण ७७९ मतदार आहेत. जिल्हा परिषद,महानगरपालिका आणि नगरपालिका/नगरपंचायतींचे मिळून एकूण ९८८ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.बीड जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नसल्यामुळे त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य मतदार म्हणून नसल्याची माहितीही त्यांनी दिली.

या बैठकीला लातूर आणि बीड जिल्ह्यांतील निवडणुकीशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
                  **************
 
Top