आंबेवाडी गावात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुक्काम ; ग्रामस्थांशी थेट संवाद, विकासकामांचा सखोल आढावा
धाराशिव,दि.७ जून (जिमाका) धाराशिव तालुक्यातील अंबेवाडी ग्रामपंचायत व परिसरातील ग्रामीण शासकीय संस्थांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी ६ जून रोजी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली.या दौऱ्यात त्यांनी गावातील सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असून त्या कार्यरत असल्याची खातरजमा केली.तसेच अपूर्ण व बंद अवस्थेत असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत आवश्यक सुधारात्मक उपाययोजनांबाबत स्पष्ट सूचना दिल्या.
सायंकाळी त्यांनी गावातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधून विविध विकासकामे तसेच गावपातळीवरील समस्या जाणून घेतल्या.याचवेळी त्यांनी स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेत विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे,त्या गावातच मुक्कामी राहिल्या आणि मुक्कामादरम्यानही त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत गावच्या समस्या सखोलपणे जाणून घेतल्या तसेच गावाच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा गावाची प्रत्यक्ष पाहणी करत स्वच्छता व्यवस्था,पाणी व्यवस्थापन व विविध विकासकामांची सखोल तपासणी केली.यावेळी गटविकास अधिकारी,सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुख तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.या मुक्कामी दौऱ्यामुळे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून गावातील विकासकामांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
******************