उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा-लोहारा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात महावितरण मंडळाकडून सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे, मुरूम शहरात अनेक ठिकाणी ग्राहकांच्या समंतीविना स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत तर अचलेर येथे बहुतांश वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्यात आले असून आज ते इलेक्ट्रिक मीटर पेक्षा अधिक बिल वसूल करणारी स्मार्ट मीटरचा शिकार बनले आहेत. या संदर्भात डॉ. रामलिंग पुराणे समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन उमरगा-लोहारा तालुक्यातील स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवण्याची विनंती केली आहे अन्यथा दि. 15 जुलै पासुन मुरूम येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
उमरगा-लोहारा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात आहेत तर काही ठिकाणी बसवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक मीटर सुरळीतपणे चालू असताना स्मार्ट मिटरची सक्ती का? उमरगा लोहारा तालुक्यातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हालाकीचे आहे, आजही रोजी रोटी साठी त्यांना दररोज संघर्ष करावा लागतो, दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर तेंव्हा दिवसभराचा रोजगार मिळतो आणि त्याच रोजगारातून त्यांना आपल्या पाल्याचा शिक्षण खर्च, कुटुंबाचा खर्च भागवून संसाराचा गाडा चालवावे लागते, म्हणजे तालुक्यातील बहुतांश भाग शेतीवर अवलंबून आहे म्हणजे शेतकरी आणि शेतमजूर असलेल्या या भागात स्मार्ट मीटरची सक्ती का..? या भागातील सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट मीटरचा खर्च पेलणारा नाही आणि जरी सक्तीने बसवण्यात आले तर पुन्हा आपण त्यांना प्रकाशातुन अंधाराकडे नेण्याचा घाट घालत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, चिमणी लावून प्रकाश होईल मात्र सरकारने घासलेट (रॉकेल) पण बंद केले आहे. इलेक्ट्रिक मीटरचा बिल सर्वसामान्य नागरिक थकबाकी न ठेवता इमानदारीने जमा करतात आज त्याच ग्राहकांना स्मार्ट मीटर सक्ती का..? आजही या भागात नागरिकांना साधा मोबाईल वापरता येत नाही ते स्मार्ट मीटर कसे वापरतील..? अनेक ठिकाणी आपण खाजगीकरण केले आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात प्रकाश देणाऱ्या भागात खाजगीकरण करून त्यांचे मरण करू नका ही विनंती. तालुक्यातील स्मार्ट मीटर सक्ती बाबत निर्णय माघार घेण्यासाठी आपण सकारात्मक विचार करून सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुकूर कराल ही अपेक्षा. खालील मागण्यावर विचार व्हावा ही विनंती.
उमरगा-लोहारा तालुक्यातील शहरी-ग्रामीण भागातील स्मार्ट मीटर सक्ती तात्काळ थांबवावी. ज्याठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत त्याठिकाणचे स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावे. इलेक्ट्रिक मीटर बिलाची सरासरी रक्कम आणि स्मार्ट मीटरने वसूल केलेली बिलाची रक्कम तफावत तात्काळ वीज ग्राहकांना परत करण्यात यावे. नागरिकांच्या समंतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये. इलेक्ट्रिक मीटर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच मीटरची दुरुस्ती करून पूर्वरत बसवण्यात यावे.किंवा नव्याने इलेक्ट्रिक मीटरच बसवण्यात यावे. वरील मागण्या संदर्भात सकारात्मक विचार करून जनसामान्य नागरिकांना न्याय देऊन कायम प्रकाशात ठेवाल ही अपेक्षा. अन्यथा 15 जुलै 2026 पासुन मुरूम येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, आंदोलना दरम्यान होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.असे निवेदनात म्हंटले आहे.
उमरगा-लोहारा तालुक्यातील शहरी, ग्रामीण भागात स्मार्ट मीटर सक्ती केली जात आहे, काही ठिकाणी बसवण्यात आले आहेत,आपला भाग शेतीवर अवलंबून असून या भागातील सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट मीटर परवडण्या सारखे नाही, आणि त्याचे परिणाम बहुतांश ठिकाणाहून सामोरे येत आहेत, सद्याचे सरकारचे धोरण पाहता खाजगीकरणावर अधिक भर दिसते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र यात मरण होणार आहे, त्यामुळे आम्ही सरकारला स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तात्काळ थांबवण्यात यावे अशी विनंती केली आहे अन्यथा आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, सरकारने नागरिकांचे हिताच्या ठिकाणी तर खाजगीकरण आणू नये अन्यथा जनता पुन्हा अंधारात जाईल, आमच्या मागण्यावर सरकार सकारात्मक विचार करेल.
-डॉ. रामलिंग पुराणे, समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान
