तुळजापूर (प्रतिनिधी)-  सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी वर्ग अनेक समस्यांनी ग्रासलेला असून त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये सुद्धा अनेक अटी आणि शर्ती लादलेले आहेत. पावसाला विलंब झाल्यामुळे दुष्काळाचं संकट उभे राहिलेले आहे अशा परिस्थितीत खचलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संघर्ष आणि संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिष्टमंडळामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, घनश्यामभाऊ चौधरी, धाराशिव जिल्हाध्यक्ष रवी इंगळे, संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर, युवक प्रदेशाध्यक्ष अमरभाऊ कदम, राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, जालना युवक जिल्हाध्यक्ष, मयूर बोर्डे यांच्यासह संघटनेचे प्रमुख  राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा या समावेश आहे आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत  आई तुळजाभवानीची आरती करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं साकडं यावेळी पदाधिकाऱ्यांनी घातले. 

दि. 21 ते 24 जून 2026 या कालावधीत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा दौरा होणार असून, संघटनात्मक बांधणी, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद तसेच आगामी आंदोलनांची दिशा निश्चित करण्याचे काम या दौऱ्यात केले जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका अधिक भक्कम करण्याचा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे.

या संवाद दौऱ्यानंतर राज्य कार्यकारिणीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार असून संघटनेची ताकद वाढविण्यासाठी आवश्यक संघटनात्मक बदलही केले जाणार आहेत.


मराठवाडा संवाद दौऱ्याचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार, दि. 21 जून  तुळजापूर (दु. 12 वा.) व लातूर (दु. 3 वा.), सोमवार, दि. 22 जून  नांदेड (दु. 12 वा.) व हिंगोली (दु. 3 वा.), मंगळवार, दि. 23 जून  परभणी (दु. 12 वा.) व जालना (दु. 3 वा.), बुधवार, दि. 24 जून  छत्रपती संभाजीनगर (दु. 2 वा.). या दौऱ्यात प्रत्येक जिल्ह्यातील शाखा प्रमुख, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा करून आगामी लढ्याची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

“राजकारणासाठी शेतकरी नाही, तर शेतकऱ्यांसाठी राजकारण“ ही भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना मराठवाड्यातील शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नव्या जोमाने संघर्ष उभारणार असल्याचा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथूभाऊ पाटील, धनाजी पेंदे उपाध्यक्ष तुळजापूर, गुरूदास भोजने तालुकाध्यक्ष, राजूभाऊ हाके, महादेव वाघमारे, रावसाहेब अडकीने, किसन देळूबकर, किसनराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 
Top