धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या बहुचर्चित खटल्यात न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे नमूद करत संशयाचा फायदा आरोपींना दिला.
न्यायालयाने आपल्या निकालात तपास प्रक्रियेतील त्रुटी आणि माफीच्या साक्षीदाराने वेळोवेळी बदललेले जबाब यांचा उल्लेख केला. तसेच सीबीआयने नोंदविलेल्या काही जबाबांवरही न्यायालयाने ताशेरे ओढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 रोजी मुंबई येथे हत्या झाली होती. या प्रकरणात माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासादरम्यान या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले होते.
2009 मध्ये तत्कालीन खासदार असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणात तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, दीर्घकालीन सुनावणीनंतर अखेर न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. निकाल जाहीर होताच धाराशिव शहरात डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरू केला.
फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत समर्थकांनी “सत्याचा विजय झाला” अशी भावना व्यक्त केली. निकालानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आज सत्याचा विजय झाला आहे. मागील वीस वर्षांपासून आमच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात राजकीय आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणाचा परिणाम लहान मुलांच्या मानसिकतेवरही झाला. राजकीय जीवनात सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागला. अखेर न्यायालयाने सत्याला न्याय दिला आहे.”
या निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल त्यांच्या भूमिकेच्या विरोधात लागल्याचे मानले जात असताना, दुसरीकडे त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनीही राजकीय वातावरण तापले आहे. निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटात जाण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले.
तर अनिल देसाई यांनी ओमराजे यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे सांगितले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल हा केवळ न्यायालयीन निर्णय नसून धाराशिवच्या राजकारणासाठीही महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. वीस वर्षांहून अधिक काळ चर्चेत राहिलेल्या या प्रकरणाच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
