तेर येथून विश्वास, विकास व जनकल्याण' अभियानाचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची यशस्वी १२ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रत्येक बुथवर २१ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. शनिवारी तेर येथून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विश्वास, विकास व जनकल्याण' अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ करण्यात येणार आहे.
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील एनडीए सरकारला ७ जून रोजी ऐतिहासिक १२ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ५ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत 'मोदी सरकारची १२ वर्षे: विश्वास, विकास व जनकल्याण' अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा भाग म्हणून, तसेच जागतिक पर्यावरण दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने देशव्यापी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत, तेर येथील बूथ स्तरावर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शनिवारी शिवराज्याभिषेकादिनी ६ जून रोजी जाहीर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय व प्रदेश समितीच्या आदेशानुसार, या अभियानाची सुरुवात पर्यावरण रक्षणाने होत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदान केंद्रावर (बूथवर) किमान २१ वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तेर येथील कार्यक्रमापासून धाराशिव जिल्ह्यातील या मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर पुढील काही आठवड्यांत विविध लोककल्याणकारी कार्यक्रमही.राबवले जाणार आहेत. ८ ते १४ जून या कालावधीत मतदारसंघातील ५०० प्रतिष्ठित व्यक्तींची भेट घेणे, तसेच प्रत्येक प्रभागात आणि ग्रामीण भागात 'प्रगती पथ यात्रा' काढली जाणार आहे. २१ ते ३० जून या कालावधीत प्रत्येक तालुका पातळीवर आयुष्मान भारत, पीएम आवास, लखपती दीदी यांसारख्या योजनांसाठी नोंदणी शिबिरे आयोजित केली जातील. तर मतदारसंघांमध्ये 'नैसर्गिक शेती' कार्यशाळा आणि २१ जून रोजी 'जागतिक योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
सुजाण नागरिकांनीही सहभागी व्हावे : आमदार राणाजगजितसिंह पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशातील गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. हे अभियान यशस्वी करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, आघाडीचे कार्यकर्ते आणि सुजाण नागरिकांनी आपापल्या बूथ स्तरावर सक्रिय सहभाग नोंदवून वृक्षारोपणाचा हा संकल्प यशस्वी करावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.