भूम अरविंद शिंदे : देशाच्या सीमांचे रक्षण करत तब्बल १८ वर्षे सेवा बजावणारा सीमा सुरक्षा दलातील ( SSB -सहस्त्र सीमा बल) जवान गेल्या जवळपास तीन वर्षांपासून बेपत्ता असून, त्याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. भूम तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील संतोष बाबासाहेब टाळके असे या जवानाचे नाव असून, त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे संपूर्ण टाळके कुटुंब चिंतेत आहे. वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले आजही त्यांच्या परतीची आशा बाळगून दिवस कंठत आहेत.
संतोष टाळके यांची २००५ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाली होती. आपल्या १८ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध ठिकाणी जबाबदारीने कर्तव्य बजावत अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या. त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे त्यांना पदोन्नतीही मिळाली होती. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने त्यांनी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांच्या प्रवेशाची तयारी केली होती. कुटुंबाला उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यासाठी त्यांनी १५ दिवसांची रजा घेतली होती.
गावी येण्यापूर्वी त्यांनी पत्नी आणि वडील बाबासाहेब टाळके यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून लवकरच घरी पोहोचणार असल्याचे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे २२ ऑगस्ट २०२३ रोजी ते सिद्धार्थनगर येथून महाराष्ट्रातील आपल्या गावी निघाले. प्रवासासाठी आवश्यक म्हणून त्यांनी एटीएममधून ३० हजार रुपये काढल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मात्र, त्यानंतर त्यांच्याशी झालेला संवाद हाच शेवटचा ठरला.
साधारण तीन दिवसांत घरी पोहोचणे अपेक्षित असताना संतोष टाळके घरी आले नाहीत. त्यांचा मोबाईल फोनही सातत्याने बंद येत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. अखेर १ सप्टेंबर २०२३ रोजी ते बेपत्ता झाल्याची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणातील तपासाबाबत कुटुंबीयांनी गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष टाळके यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन गोरखपूर परिसरात आढळले होते. मात्र, दुसरीकडे त्यांचा मोबाईल सिद्धार्थनगर येथे सापडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तपासाची दिशा आणि निष्कर्ष याबाबत संभ्रम निर्माण झाला असून कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
संतोष टाळके यांचे वडील बाबासाहेब टाळके यांनी सुरुवातीला परांडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी तक्रार स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच महत्त्वाचा वेळ वाया गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, संतोष टाळके यांची दोन लहान मुले आजही आपल्या वडिलांच्या प्रतिक्षेत आहेत. "पप्पा कुठे आहेत? ते घरी कधी येणार?" असा निरागस प्रश्न ते दररोज विचारतात. या प्रश्नांची उत्तरे देताना आई आणि आजी-आजोबांच्या डोळ्यांत अश्रू दाटून येतात. वृद्ध आई-वडील आजही घरासमोरील रस्त्याकडे आशेने पाहत बसतात. एक दिवस मुलगा अचानक घरी परत येईल, या विश्वासावर त्यांचे दिवस सरत आहेत.
देशासाठी तब्बल १८ वर्षे सेवा करणाऱ्या जवानाचा अद्याप शोध लागलेला नसल्याने वांगी बुद्रुकसह परिसरातील ग्रामस्थांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासन, केंद्र शासन तसेच उत्तर प्रदेश प्रशासनाने या संवेदनशील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपासाला गती द्यावी आणि संतोष टाळके यांचा शोध लावावा, अशी मागणी कुटुंबीय व ग्रामस्थांकडून होत आहे.
"माझ्या मुलाने आयुष्यभर देशाची सेवा केली. आता शासन आणि प्रशासनाने त्याचा शोध घेण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावाव्यात. आम्हाला आमचा मुलगा परत मिळावा, एवढीच अपेक्षा आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया बाबासाहेब टाळके यांनी व्यक्त केली.

.संतोष टाळके यांच्या वडिलांनी मुलगा वापस येण्यासाठी पण घेतला असून दररोज वांगी गावातील हनुमान मंदिरामध्ये रोज दिवा अगरबत्ती करून मुलगा वापस येण्यासाठी देवाकडे साकडे घातले आहे .

.महाराष्ट्र शासन सरकारने व उत्तर प्रदेश सरकारने माझ्या मुलाला मुलाला ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून शोधून आणून माझ्या पधरात टाकावे .रोज मी त्याची वाट पाहून आठवणीत असते की आज तरी माझा मुलगा घरी येईल या आशेने मी दररोज रस्त्याकडे माझे डोळे असतात मात्र रात्र होते पण माझा मुलगा आलेला दिसत नाही .माझ्या नातवाला त्याचे वडील कुठे गेले आहेत असा प्रश्न विचारतात मात्र त्याचे पप्पा केव्हा येणार आम्हाला सांगता येत नाही .
संतोष टाळके यांची आई
 
Top