मृत कामगाराच्या कुटुंबाला न्याय द्या; अजमेरा कन्स्ट्रक्शनची कामे व बिले रोखा : जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

तुळजापूर, प्रतिनिधी : अजमेरा कन्स्ट्रक्शन' कंपनीने कामगार कायद्यांचे उल्लंघन करून मृत कामगाराच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान केल्याचा गंभीर आरोप करत कंपनीची सर्व शासकीय कामे व देयके तात्काळ थांबवावीत, अशी मागणी बारूळ (ता. तुळजापूर) येथील लिंबराज मेनकुदळे यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मेनकुदळे यांचा मुलगा बस्वराज हा संबंधित कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होता. ३ एप्रिल २०२६ रोजी कामावरून घरी परतत असताना अपघातात त्याचा मृत्यू झाला. तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे.

तक्रारीनुसार, बस्वराज याच्या मृत्यूनंतर कंपनीने कोणतीही आर्थिक मदत केली नाही. तसेच भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी ठेव लिंक विमा योजना (ईडीएलआय) संदर्भातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याने कुटुंबाला सुमारे दहा लाख रुपयांच्या लाभापासून वंचित राहावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेली कंपनीची सर्व कामे तात्काळ थांबवून प्रलंबित देयके रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कामगार आयुक्त किंवा अन्य सक्षम अधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करून कुटुंबाला नुकसानभरपाई मिळेपर्यंत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित कंपनीची भूमिका समजू शकलेली नाही. जिल्हा प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
 
Top