तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये मे महिन्यात श्री तुळजाभवानी मंदिर परिसर, भवानी रोड, महाद्वार परिसर तसेच शुक्रवार पेठ मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईमुळे मंदिर महाद्वार परिसर काही काळ अतिक्रमणमुक्त झाला होता. मात्र संबंधित विभागांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा कासवगतीने अतिक्रमणे वाढू लागल्याचे चित्र दिसून येत असून भाविकांच्या गैरसोयीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पोलीस नगरपरिषद मंदिर प्रशासन यांनी अतिक्रमणे होण्यासाठी सातत्याने कारवाई करणे गरजेचे बनले आहे
मंदिर महाद्वारासमोर मोठ्या प्रमाणात फेरीवाले व अतिक्रमणधारक बसत असल्याने मंदिरात येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे चोरी, पाकिटमारी तसेच सोने-नाण्यांच्या चोरीसारख्या घटनांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मंदिर पोलीस चौकीने या भागातील अतिक्रमण रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विशेषतः बांगड्या, गंडेदोरे व पूजासाहित्य विक्रेते रस्त्याच्या मध्यभागीच व्यवसाय करत असल्याने भाविकांना मार्गक्रमण करताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. काही विक्रेत्यांकडून कमी किमतीचे आमिष दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. मात्र खरेदी झाल्यानंतर अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. विशेषतः महिला भाविकांची आर्थिक फसवणूक होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
याशिवाय बांगड्या फुटल्यानंतर त्यांच्या काचा रस्त्यावरच पडून राहत असल्याने भाविकांच्या पायाला दुखापत होण्याच्या घटना घडत आहेत. मधुमेह व इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या भाविकांसाठी हा प्रकार अधिक धोकादायक ठरत असल्याने नियमित स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
महाद्वार परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध असतानाही अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच नगरपरिषद, पोलीस प्रशासन आणि मंदिर संस्थान यांनी संयुक्त मोहीम राबवून परिसर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, यापूर्वी मंदिर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना एपीआय चौधर यांनी अतिक्रमण रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या काळात महाद्वार परिसरात अतिक्रमणांचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे नागरिक सांगतात. मात्र त्यांच्या बदलीनंतर पुन्हा अतिक्रमणे वाढू लागल्याची चर्चा आहे.
वेळीच कठोर कारवाई न झाल्यास महाद्वार परिसर पुन्हा अतिक्रमणांनी व्यापला जाण्याची भीती व्यक्त केली जात असून त्याचा सर्वाधिक फटका तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी भाविक आणि नागरिकांकडून होत आहे.