आम्ही फक्त महाविकास आघाडी सोबतच ठाम आहोत - पवार
अर्ज काढून घेताना मित्रांसोबत फोटो काढणे गैर नाही
धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मी देखील उमेदवारी अर्ज महाविकास घटक पक्षातील शिवसेना पक्षाकडून भरला होता. मा विकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी मी शेवटपर्यंत अर्ज ठेवला होता. मात्र, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा फोन आल्यामुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात गेलो, तेथे खा. राजेनिंबाळकर व शिवसेना उमेदवार संजय मुंदडा उमेदवारी अर्ज माघारी घेतला, मी देखील अर्ज मागे घेतला. मात्र, खा राजेनिंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालयात कक्षात बोलत असताना मी बाहेर आलो. त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व जिल्हा प्रवक्ते ऍड नितीन भोसले हे तेथे पूर्वीच आलेले होते. आम्ही खाली आल्यानंतर पोर्च समोर थांबला असता फोटो काढण्यात आला. ते आमचे राजकीय विरोधक असले तरी मित्र आहेत. त्यामुळे आमच्या फोटोसोबत त्यांचेही फोटो वृत्तपत्रांमध्ये बातमी स्वरूपात छापून आले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र विरोधकांनी रंगविले. मात्र आमचा भाजप किंवा महायुती यांच्याशी कुठलाही संबंध असून आम्ही महाविकास आघाडी सोबतच थांब आहोत आणि राहणार असल्याचा दावा वजा खुलासा धाराशिव नगर परिषदेतील शिवसेना (ठाकरे) चे गटनेते राजाभाऊ पवार यांनी दि.५ जून रोजी केला.
धाराशिव शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक नाना घाटगे, पंकज पाटील, शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना जिल्हाप्रमुख रवि वाघमारे, जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर, अमित उंबरे, राज निकम, ज्ञानदेव करवर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फोटो काढल्यानंतर आम्ही आमच्या कामासाठी निघून जात असताना भाजपचे कुलकर्णी यांनी चहा प्यायचा का असे विचारल्यानंतर आम्ही चहा पिण्यासाठी गेलो. त्यावेळी कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसून आली त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक घाटगे म्हणाले की, तुम्ही पक्षात नाराज असाल तर या आमच्या शिवसेनेत असे आमंत्रण दिले, त्यावर कुलकर्णी यांनी स्मित हास्य केले असल्याचे घाटके यांनी सांगितले. मात्र, निवडणुकीच्या अनुषंगाने दोघांकडून देखील कुठलीही चर्चा केली गेली नाही. केवळ उमेदवारी अर्ज काढण्यास दोन्ही पक्षाची मंडळी उमेदवारी अर्ज काढण्याच्या ठिकाणी एकत्र आली म्हणून ते कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नसतात किंवा पाठिंबा देत नसतात असा खुलासा त्यांनी केला. मात्र, त्या ठिकाणी एकत्र बोलत असताना फोटो काढू असे म्हणत तो फोटो काढला. तो प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कोणी पोहोचला आणि त्याची बातमी का केली ? हे मात्र आम्हाला न समजण्यासारखी असल्याचे त्यांनी सांगितले.